बोटा : सारोळेपठार (ता.संगमनेर) येथे एकाच रात्री अकरा ठिकाणी घरफोड्या केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेत ऐवज चोरीस गेल्याची चर्चा असून मात्र निश्चित आकडेवारी समजू शकली नाही.याबाबत मिळालेली माहिती अशी सारोळेपठार येथील गावठाण परिसरातील भास्कर गणपत फटांगरे, विष्णूपंत गाडेकर, विलास महादू फटांगरे, रामनाथ महादू फटांगरे, बादशहा घुले, संदीप पोखरकर, दिलीप विश्राम पोखरकर, लहानू फटांगरे, रवींद्र फटांगरे, बाळासाहेब यशवंत पोखरकर यांची घरे बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधून कडी, कोंडा उचकून शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घरफोड्या केल्या. दरम्यान शनिवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याबाबत आजूबाजूच्या नागरिकांना साधी कुणकुणही न लागल्याने चोरटे सराईत असल्याचे अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेत रोख रक्कम व सोन्याचा ऐवज चोरीस गेल्याची चर्चा आहे. घारगाव पोलिसांनी घटनास्थळी येत घटनेची माहिती घेतली आहे. तातडीने तपास करावा, अशी मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष सुधीर पोखरकर यांनी केली आहे.