संगमनेर : राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असताना प्रशासनाने निर्बंध अधिक कडक केले आहेत. रविवारपासून (दि.२८) रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीसाठी निर्बंध घालण्यात आले असून, हा आदेश १५ एप्रिलपर्यंत संपूर्ण राज्यात लागू राहणार आहे. संगमनेर शहर व परिसरात प्रशासनाकडून दवंडी देऊन नव्या निर्बंधांची माहिती नागरिकांना देण्यात आली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क लावा, मास्क न लावल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल. शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये, तसे झाल्यास एक हजार रुपये दंड केला जाईल, असे तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले.
रात्री आठनंतर संगमनेर शहर परिसरातील कोणतीही दुकाने, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट अथवा सार्वजनिक ठिकाणे खुली राहणार नाहीत. यातून केवळ औषधांची दुकाने वगळण्यात आली आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी सांगितले.