सचिन धर्मापुरीकर, लोकमत न्यूज नेटवर्क, कोपरगाव (जि. अहमदनगर) : अर्ध्या कोपरगाव तालुक्याला मंगळवारी सायंकाळी वादळी पावसाने झोडपून काढले. अनेक घरांची पडझड झाली असून कांदाचाळींचे नुकसान झाले आहे. वेगवेगळ्या गावांमध्ये मोठमोठी वृक्ष मुळासकट उन्मळून पडली आहेत. तालुक्यात कुठेही जीवितहानी झालेली नाही.
मृग नक्षत्रावर पाऊस होत असल्याने एकीकडे समाधानाचे वातावरण असतानाच दुसरीकडे घरांची पत्रे उडून जाने, झाडे पडणे, विजेचे खांब वाकणे अशा घटना घडत आहेत. कोळपेवाडी, सुरेगाव, कोळगावथडी, माहेगाव देशमुख, वारी, रवंदे, कोकमठाण व पोहेगाव आदी भागात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
या पावसात सुरेगाव येथील दिनेश बोरा यांचे कांद्याचे शेड पूर्णपणे पडले. याच गावातील शैलेंद्र वाबळे यांच्या घराची पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे. मौजे कोळगाव थडी येथील दगू निंबाळकर व भागवत निंबाळकर यांच्या घराशेजारी असलेले मोठे पिंपळाचे झाड घरावर पडून घराचे नुकसान झाले आहे. यात सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. कोळगाव थडी येथेच संजय यशवंत शेलार यांच्याही घरावरील पत्रे उडाली. वारी येथे पंडित रंभाजी चव्हाण यांच्या घराचा धाबा पडला आहे.
सर्वाधिक पाऊस सुरेगाव मंडळात
कोपरगाव तालुक्यात मंगळवारी रात्री मंडळनिहाय झालेल्या पावसाची बुधवारी सकाळी झालेली नोंद पुढील प्रमाणे. कोपरगाव- ३.८ मिमी, रवंदे - २७ मिमी, दहेगाव बोलका २.३ मिमी, पोहेगाव २५.३ तर सुरेगाव मंडळात ३७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसामुळे कुठेही जीवितहानी झाली नसल्याचे नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांनी सांगितले.