अहमदनगर : महापालिकेच्या शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत नागापूर बोल्हेगाव परिसरात टाकलेल्या जलवाहिनीवर पक्की घरे, विद्युत खांब, तर काही ठिकाणी ड्रेनेजलाइन टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे फेज-२ योजना वापरात येते की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
महापालिकेने शहर सुधारित पाणीपुरवठा योजना राबविली. योजनेचे काम सुरू होऊन सात वर्षांहून अधिक कालावधी उलटून गेला. मुळा धरण ते वसंत टेकडीसह जलकुंभाचे काम पूर्ण झाल्याने ठेकेदाराकडून आता शहरातील वितरण व्यवस्थेच्या चाचणीचे काम हाती घेतले गेले आहे. बोल्हेगाव परिसरातील जलकुंभाचे पाणी जलवाहिनीत सोडून ही चाचणी घेतली जात असताना अनेक धक्कादायक प्रकार समाेर येऊ लागले आहेत. ही जलवाहिनी रस्त्यांच्या बाजूने टाकण्यात आलेली होती; परंतु त्यावर आता पक्की घरे उभी राहिली आहेत. तसेच रस्त्यांच्या बाजूने विद्युत खांब उभे केले गेले. हे खांब जलवाहिनी फोडून त्यात उभे गेल्याने वास्तव समोर आले आहे. त्यामुळे जलवाहिनीला ठिकठिकाणी छिद्रे पडली आहेत. यातून अक्षरश: पाणी उकळ्या मारत असल्याचे चित्र आहे. सात वर्षांनंतर ठेकेदाराने प्रत्यक्ष चाचणीला सुरुवात केली; परंतु जलवाहिनीच ठिकठिकाणी तुटल्याने जलकुंभाचे पाणी नळापर्यंत पोहोचण्यात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत.
फेज-२ योजनेंतर्गत टाकलेल्या जलवाहिन्यांची चाचणी मुकुंदनगर, शांतीनगर आदी भागांत चाचणी सुरू करण्यात आली आहे. जलवाहिनी टाकून सात वर्षांहून अधिक कालावधी उलटून गेला. गेल्या सात वर्षांत अनेक बदल झाले. रस्ते, भुयारी गटार, विद्युत खांब, यासह रस्त्यांच्या बाजूने नवीन इमारती उभ्या राहिल्या. जलवाहिन्या या कामांमुळे खाली दबल्या. अनेक ठिकाणी तर आता जलवाहिन्याही सापडत नाहीत. एका बाजने पाणी सोडल्यानंतर ते दुसऱ्या बाजूने बाहेर येत नाही. ते मध्येच पडलेल्या छिद्राद्वारे बाहेर येत असून, काहींच्या घरातूनही पाणी बाहेर येत असल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे पाणी योजनेला अनेक ठिकाणी मुगारे पडले असून, योजना कार्यान्वित होण्याआधीच तिला गळती लागली असल्याचे एका ठेकेदाराने खासगीत बोलताना सांगितले.
....
योजना हस्तांतरण लांबणीवर
फेज-२ योजना ठेकेदाराकडून ताब्यात घेताना चाचणी यशस्वी झाल्याची खात्री करणे गरजेचे झाले आहे. शहरात ५६५ कि.मी. इतक्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या असून, ही योजना कार्यान्वित होण्याआधीच तिला गळती लागली असून, भविष्यात आणखी गंभीर प्रश्न यामुळे निर्माण होणार आहेत.