पारनेर : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते विजय औटी पराभूत झाले आणि या नगरसेवकांना ते लगेच वाईट कसे वाटू लागले? विधानसभा निवडणुकीत कुटुंबासह प्रचार करणारे औटी हेच मतदारसंघाचे भाग्यविधाते आहेत, असे घसा ताणून सांगणारे औटी पराभूत होताच राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले. हा स्वार्थीपणा आहे, असा आरोप माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, अर्जुन भालेकर यांनी शनिवारी (११ जुलै) पत्रकार परिषदेत केला.
शिवसेनेतून राष्ट्रवादीत व त्यानंतर पुन्हा शिवसेनेत प्रवेश केलेल्या पारनेर नगरपंचायतीच्या नगरसेवकांच्या टोळीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार निलेश लंके यांची दिशाभूल केली आहे. शिवसेनेतून राष्ट्रवादी, पुन्हा शिवसेना असा प्रवास करणारे नगरसेवक किसन गंधाडे, मुद्दसीर सय्यद, नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी यांनी गेल्या साडेचार वर्षात त्यांनी विकासाचा विचार का केला नाही? सत्तांतर झाल्यानंतरच विकास का डोक्यात घुसला? विधानसभा निवडणुकीत नेतृत्व पराभूत झाल्यानंतर यांना विकास कळाला का? असा आरोप चेडे यांनी केला.
नंदकुमार देशमुख यांच्यासह किती नगरपंचायतीच्या मासिक सभांमध्ये या नगरसेवकांनी पाणी योजनेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले? किती प्रस्ताव सादर केले? कोणास निवेदन दिले? त्या नगरसेवकांनी स्वत:च सभांचे इतिवृत्त जनतेसमोर मांडावे, असे आव्हानही चेडे व भालेकर यांनी दिले.