अहमदनगर : जिल्हा बँकेच्या नोकरभरतीची जाहिरात संपूर्ण महाराष्ट्रासाठी देण्यात आली असताना अहमदनगर जिल्ह्यातील ठराविक तालुक्यांतीलच उमेदवार उत्तीर्ण कसे झाले? असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी उपस्थित केला आहे. त्यासोबतच निवड झालेल्या उमेदवारांची जिल्हानिहाय यादी जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.याबाबत त्यांनी सोमवारी नोकरभरतीचे चौकशी करणारे चौकशी अधिकारी तथा नगर तालुका सहायक निबंधक राम कुलकर्णी यांना ३ पानी निवेदन सादर केले. बँकेच्या विविध प्रकारच्या ४६४ पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेबाबत त्यांनी निवेदनात काही मुद्दे उपस्थित केले आहेत. परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून परीक्षा प्रक्रियेचे चित्रीकरण झाले आहे काय? उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग केले का? ते कुठे व केव्हा केले? याचा दिनांक नमूद आहे का? उत्तरपत्रिका स्कॅनिंग करून चित्रीकरण करून सील केल्या का? त्याचदिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे परीक्षार्र्थींना कार्बन कॉपी देण्यात आली काय? परीक्षेनंतर उत्तरपत्रिका कुठे ठेवल्या होत्या?आजपयर्जंत त्या कुठे ठेवल्या?सीलबंद खोलीत ठेवल्या आहेत काय? बँकेची जाहिरात रिझर्व्ह बँक व ‘नाबार्ड’च्या निकष,अटी, शर्तीनुसार वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव या तपशिलानुसार आहे, की बँकेने यात काही बदल केले? असल्यास संबंधितांकडून त्यास मान्यता घेण्यात आल्या का?मुख्य कार्यकारी अधिकाºयांचा मुलगा परीक्षार्थी असताना ते या प्रक्रियेत सचिव म्हणून कसे काम पाहत होते? इतर संचालकांचेही नातेवाईकही लाभार्थी असताना ते भरतीप्रक्रियेत हजर होते काय? याबाबत संचालक मंडळास माहिती दिली होती का? याबाबत चौकशी करावी.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक भरतीप्रक्रियेत मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी कोणकोणते नियमबाह्य लाभ संचालकांकडून मंजूर करून घेतले? याची चौकशी करावी. मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन अहमदनगर जिल्हा बँकेत नियुक्त झाले आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात नियमबाह्य पगारवाढी, बोनस व रजेचे पगार घेतला असल्याचे चंगेडे यांनी पत्रकात म्हटले आहे. सुधीर भद्रे यांनीही तक्रार दाखल केली आहे.
बँकेच्या भरतीबाबत तक्रारींची माहिती गोपनीय
वादग्रस्त ठरलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीबाबत हरकती, तक्रारी, आक्षेप दाखल करण्यासाठीची मुदत सोमवारी दुपारी संपली. शेवटच्या दिवशीदेखील चौकशी अधिकारी राम कुलकर्णी यांच्याकडे नोकरभरतीबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, चौकशी समितीकडे आत्तापर्यंत किती तक्रारी, हरकती व आक्षेप पुराव्यांसह सादर करण्यात आले. ही बाब गोपनीय आहे. त्यामुळे याबाबत सध्यातरी काहीही माहिती देता येणार नाही़या भरतीबाबत ‘लोकमत’ने सुरुवातीपासून वार्तांकन करीत भरतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. बँकेने पुणे येथील नायबर या खासगी संस्थेकडे नोकरभरतीची जबाबदारी सोपविली होती. त्यानुसार सलग दोन दिवस शहरातील विविध शाळांमधील परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. राज्यभरातून या परीक्षेसाठी १७ हजार उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. सुरुवातीस या परीक्षेची प्रश्नपत्रिकेसोबतच उत्तरपत्रिकेच्या प्रती देण्यात येणार नव्हत्या. ‘लोकमत’ने परीक्षार्र्थींनी केलेल्या मागणीनुसार लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या धर्तीवर परीक्षार्र्थींना उत्तरपत्रिकेच्या कार्बन प्रती उपलब्ध करून देण्याची सूचना केली होती. त्याची दखल घेत बँकेने परीक्षार्र्थींना उत्तरपत्रिकेच्या कार्बनप्रती देण्याची व्यवस्था केली. आॅनलाइन निकाल जाहीर केल्यानंतर बँकेच्या समितीने उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर तब्बल महिनाभराने निवड झालेल्या उमेदवारांच्या याद्या बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या.या याद्यांमधून बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांचा मुलगा परीक्षेला व मुलाखतीला असताना वर्पे मुलाखतींच्या पॅनेलमध्ये होते. ही बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर सहकारमंत्री, सहकार सचिव व सहकार आयुक्तांनी या बँकेतील नोकरभरतीबाबत चौकशी करण्याचा आदेश नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांना दिला. त्यांनी चौकशी देतानाच पुढील आदेशापर्यंत बँकेने भरती प्रक्रिया थांबवून नियुक्ती आदेश देऊ नयेत, असे निर्देश देत नोकरभरतीस स्थगिती दिली. त्यानंतर विभागीय सहनिबंधकांच्या आदेशानुसार नगर तालुक्याचे सहायक निबंधक राम कुलकर्णी हे नोकरभरतीची चौकशी करीत आहेत.
नोकरभरतीबाबत कोणत्याही चौकशीला आम्ही तयार आहोत. चौकशी समितीला सर्व कागदपत्रे दिली आहेत.- रावसाहेब वर्पे, मुख्य कार्यकारी अधिकारी