संगमनेर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम’ बसविण्यात आली आहे. महामंडळाने एक ॲप विकसित केले असून, त्याद्वारे एका क्लिकवर बसचे लोकेशन कळणार आहे. मात्र, सध्या ही सुविधा नाशिक विभागातील गाड्या व मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी सेवेसाठीच उपलब्ध आहे. उर्वरित महाराष्ट्रातील इतर विभाग व मार्गावरील बसेससाठी हे ॲप लॉचिंंग लांबणीवर पडले आहे.
अहमदनगर विभागात सहा महिन्यांपूर्वी बसेस आणि मालवाहतूक अशा एकूण ५५८ वाहनांना ही सिस्टिम बसविण्यात आली आहे. मात्र, अहमदनगर विभागात ही सुविधा सुरू झाली नसल्याचे ॲप सुरू केल्यानंतर दिसणाऱ्या संदेशातून समजते.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस म्हणजेच एसटी सर्वसामान्यांना हक्काची वाटते. ‘गाव तेथे एसटी’, ‘रस्ता तेथे एसटी’ या ब्रीदवाक्याप्रमाणे अगदी खेड्यांपासून ते बड्या शहरांपर्यंत एसटीची सेवा पोहोचली आहे. परराज्यात देखील महामंडळाच्या बसेस जातात. साध्या बसनंतर आता अगदी वातानुकूलित बसेस रस्त्यांवर धावताना दिसतात. मात्र, या बसेस अनेकदा बसस्थानकात, बस थांब्यांवर उशिरा येत असल्याने प्रवासी बसची वाट पाहत ताटकळतात.
महामंडळाने काळानुरूप आपल्या सेवेत बदल केले. प्रवाशांची गैरसोय दूर होण्यासाठी बसला ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम’ बसविली आहे. बसची माहिती समजण्यासाठी ‘एमएसआरटीसी कॉम्प्युटर ॲप’ विकसित केले आहे. ते डाऊनलोड केल्यानंतर ते वापरासंदर्भाने परवानगी मागितली जाते. परवानगी दिल्यानंतर ॲप सुरू होते. त्यात विविध पर्याय दिले असून, त्याद्वारे सर्व माहिती समजू शकते. गाव, खेड्यांकडे जाणाऱ्या बसलादेखील ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम’ बसविण्यात आली आहे. मात्र, नाशिक विभागातील गाड्या आणि मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी सेवेसाठी वगळता, इतर ठिकाणी ही सुविधा सुरू केलेली नाही. शहरी आणि ग्रामीण भागात देखील लवकरात लवकर ही सुविधा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
-------------
टप्प्या-टप्प्याने सर्व जिल्ह्यांचा समावेश
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना माहितीसाठी ‘एमएसआरटीसी कॉम्प्युटर ॲप’ विकसित करण्यात आले आहे. नाशिक विभागातील बसेस व मुंबई-पुणे-मुंबई या शिवनेरी सेवेचा यात समावेश करण्यात आला आहे. टप्प्या-टप्प्याने राज्यातील सर्व जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होणार आहे, ही माहिती ॲपद्वारे मिळाली.
-----------------
काय आहे ॲपमध्ये...
ॲपमध्ये जवळील बसस्थानक, बस शोधा, बस थांबा शोधा, मार्ग शोधा, प्रवासाचे नियोजन करा, आपत्कालीन, अभिप्राय, आमच्याबद्दल असे पर्याय उपलब्ध आहेत. त्यावर क्लिक केले असता संबंधित माहिती उपलब्ध होते. जवळील बसस्थानक या पर्यायावर क्लिक केल्यास आपण ज्या ठिकाणी आहोत, तेथील बसस्थानकाची माहिती मिळते. तेथे येणाऱ्या बसची माहिती बस क्रमांकासह कळते. बस कुठपर्यंत आली, बसस्थानकात कधी पोहोचेल याबाबत सविस्तर माहिती कळते.
-------------
संगमनेर बसस्थानकातील स्क्रीन बंद
संगमनेर बसस्थानकात दोन मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत. त्यावर संगमनेर बसस्थानकात येणारी बस कुठे आहे, ती स्थानकात येण्यास किती वेळ लागेल, याबाबत माहिती दिली जाणार आहे. मात्र, हे स्क्रीन काही तांत्रिक कारणाने सुरू केलेले नाहीत. दोन दिवसात ते सुरू करणार असल्याचे संगमनेर बसस्थानकातून सांगण्यात आले.
-----------------
‘एमएसआरटीसी कॉम्प्युटर ॲप’मध्ये आठ पर्याय
‘एमएसआरटीसी कॉम्प्युटर ॲप’मध्ये आठ पर्याय उपलब्ध आहेत. त्यात काही उपपर्यायदेखील आहेत. आपत्कालीन पर्यायात महिला सुरक्षा, वैद्यकीय मदत आदी उपपर्याय आहेत. महिला सुरक्षा यावर क्लिक केल्यास त्यात भ्रमणध्वनी क्रमांक, सेवा क्रमांक, कुटुंब किंवा ओळखीच्या व्यक्तीचा भ्रमणध्वनी क्रमांक ही माहिती त्यात नमूद करीत सादर करता येऊ शकते.
------------
जिल्ह्यात यंत्रणा बसविलेली वाहने...
आगार एकूण बसेस यंत्रणा बसविलेल्या बसेस
११ ५५८ ५५८ (बसेस, मालवाहतूक गाड्या)