अहमदनगर : कोरोनाच्या प्रादुर्भावातही गेल्या वर्षभरापासून पोलीस, डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचारी अविरत सेवा देत आहेत. कर्तव्य निभावत असताना अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे तर काहींना जीवही गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत स्वत:च्या शरिरासह मानसिक आरोग्य सांभाळण्याचे आव्हान पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसामोर आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीची पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने पोलिसांवरील कामाचा ताणही वाढला आहे. बारा तासांपेक्षा जास्त वेळ पोलीस कर्मचाऱ्यांना डयुटी करावी लागत आहे. डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचारी तर उपचारांच्या माध्यमातून थेट कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात येतात. अशा परिस्थितीत दोन्ही क्षेत्रात काम करणारे हे फ्रंटलाईन वर्कर मानसिक तणावाखाली आहेत. त्यांच्यावरील मानसिक तणाव कमी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून उपाययोजना राबविणे गरजेचे असल्याचे मत पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
--------
नोकरी अन् कुटुंब सांभाळण्याची कसरत
दिवसभर तर कधी रात्रीही ड्युटी करावी लागते. कितीही काळजी घेतली तरी कधी प्रादुर्भाव होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे घरी कुटुंबात गेल्यानंतर खूप काळजी घ्यावी लागते. कुटुंबात पहिल्यासारखे मिसळता येत नाही. घरात वेगळे थांबावे लागते. अशा परिस्थितीत मानसिकदृष्ट्या सक्षम राहून काम करावे लागत आहे.
- पोलीस कर्मचारी, नगर
-------
रुग्णालयात थेट कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात यावे लागत असल्याने दिवसभर मोठी काळजी घ्यावी लागते. बहुतांशीवेळा जास्त वेळ डयुटी करावी लागते. उघड्या डोळ्याने मृतदेह पाहावे लागतात. आम्ही कर्तव्यापासून मागे हटत नाही मात्र अशा परिस्थितीत कुटुंबाची जबाबदारी सांभाळणे मोठे अवघड ठरत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.
- आरोग्य कर्मचारी, नगर
---------------
कोरोनाच्या काळात कर्तव्य निभावत असताना पोलीस कर्मचारी मानसिकदृष्ट्या सक्षम राहावेत, यासाठी गतवर्षी कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलीस ठाणेनिहाय तणावमुक्ती शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ऑनलाईन योगा वर्गही आयोजित करण्यात आले होते. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आरोग्याच्या दृष्टीने नियमांचे पालन करून उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे.
- प्रांजल सोनवणे, पोलीस उपअधीक्षक, (गृह)
------------------
आरोग्य कर्मचाऱ्यांसह पोलिसांवरही सध्या कामाचा मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत स्वत:चे मानसिक आरोग्य सांभाळणे खूप महत्त्वाचे आहे. कर्तव्य निभावताना समोर आहे ती परिस्थिती स्वीकारून सकारात्मक विचार करावा, काळजी घ्यावी पण पुढे काय होईल, याची चिंता करू नये. छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद घ्यावा, आपल्या सहकाऱ्यांना समजून घेत त्यांच्या कामाचे कौतुक करावे, वाईट गोष्टींवर चर्चा न करता जे चांगले घडले आहे त्याकडे पाहावे. विचार आणि चर्चेमुळे जो मानसिक त्रास होतो, ते करणे टाळावे.
- विशाल लाहोटी, मानसशास्त्रज्ञ
कोरोनासाठी कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी
जिल्हा परिषद - १३१४
जिल्हा रुग्णालय - ग्रामीण रुग्णालये - १२३३
राष्ट्रीय आरोग्य अभियान - ११००
----------------------
जिल्ह्यात कार्यरत पोलीस
पोलीस कर्मचारी - २९२६
पोलीस अधिकारी - १६२
----------
डमी आहे.