श्रीगोंदा/मढेवडगाव : आमचे पाचपुतेंशी राजकीय मतभेद होते. पण किती वर्षे संघर्ष करायचा? त्यातून जनतेच्या पदरात काय पडले? हा प्रश्न आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पाचपुतेंच्या प्रचारासाठी आमची यंत्रणा सक्रिय करणार आहे, असे नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सांगितले.मढेवडगाव (ता. श्रीगोंदा) येथे भाजपचे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिजाबापू शिंदे होते. नागवडे म्हणाले, आमच्या भाजप प्रवेशानंतर कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आहे, आपले कसे होणार? पण चिंता करू नका. सर्वांना पद आणि मानसन्मान मिळेल. गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, सुजय विखे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे आपल्या बरोबर आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. पाचपुते म्हणाले, राजेंद्र नागवडे यांनी विनाअट भाजपात प्रवेश केला. नागवडे यांचे विचारांची उंची असलेले घराणे आहे. नागवडे साखर कारखान्यात मी बापूंची वडीलकीची भूमिका बजावणार आहे. कुठेही अडचण येऊ देणार नाही. भगवानराव पाचपुते म्हणाले, बबनराव निवडणुकीत पास होणार आहेत. पण त्यांना नामदार करण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितल्याप्रमाणे मेरिटमध्ये आणावे लागेल. नागवडे गटाची साथ मिळाल्याने ते समीकरण यशस्वी होईल. बाळासाहेब महाडिक, सुभाष शिंदे, विठ्ठलराव काकडे, जिजाबापू शिंदे, बापूसाहेब वाबळे, संग्राम शिंदे, प्रकाश उंडे यांची भाषणे झाली.
पाचपुतेंशी किती वर्षे संघर्ष करायचा?-राजेंद्र नागवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 5:46 PM