अहमदनगर : निघोज (ता. पारनेर) येथील कुंड परिसरातील कुकडी नदीपात्रात धान्याच्या कोटीत आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून मुलानेच मित्राच्या मदतीने पित्याचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.
सतीश सदाशिव कोहकडे (वय ४९, रा. कारेगाव ता. शिरूर जि. पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेतील आरोपी असलेला मयताचा मुलगा प्रदीप सतीश कोहकडे याच्यासह त्याचे मित्र हर्षल सुभाष कोकडे, श्रीकांत बाळू पाटोळे व दोन अल्पवयीन मुलांना (रा. सर्व कारेगाव) पोलिसांनी अटक केली आहे.
निघोज परिसरातील कुकडी नदीपात्रात २७ आॅगस्ट रोजी धान्याच्या कोठीत एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत टाकळीहाजी येथील माजी सरपंच दामू धोंडीबा घोडे यांनी पारनेर पोलिसांना माहिती दिली होती. या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा व पारनेर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. दरम्यान ११ सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन (ता. शिरुर) येथे मयताच्या वर्णनाशी मिळतेजुळती मिसिंग तक्रार दाखल झाल्याची माहिती पारनेर पोलिसांना समजली होती. पोलिसांनी याबाबत माहिती घेतली तेव्हा सदर हरवलेली (मिसिंग) व्यक्ती ही सतीश सदाशिव कोकडे असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी सतीश यांच्या नातेवाईकांशी संपर्क करून मयताचे कपडे, हातातील दोरा, करदोरा व मृतदेहाचे फोटो दाखविले तेव्हा मयत हे सतीश कोकडे असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. पोलिसांनी मयताचा मुलगा प्रदीप याच्याकडे अधिक चौकशी केली तेव्हा त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक कसून चौकशी केली तेव्हा त्याने मित्रांसमवेत पित्याचा खून केल्याची कबुली दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपाधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ, उपनिरीक्षक पद्मने, बोत्रे, हेड कॉन्स्टेबल जाकीर शेख, निकम, दिवटे, चौगुले, खाडे पाचारणे, शिंदे, राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली.--------या कारणामुळे केला खूनमयत सतीश कोहकडे याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. घरभाडे व शेतीतून मिळणारे पैसे सतीश हा त्या महिलेवर खर्च करत होता. तसेच तो पत्नीलाही मारहाण करत होता. या कारणावरून सतीश व त्याचा मुलगा प्रदीप यांच्यात वाद होत होते. याच कारणातून २३ आॅगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता प्रदीप याने घरात त्याच्या मित्राच्या मदतीने सतीश याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याचा कापडी पट्ट्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह कुकडी नदीत आणून टाकला. यावेळी आरोपींनी मयताची कार शिरूर तालुक्यातील करडे घाटामध्ये खाली दरीत ढकलून दिली, अशी कबुली आरोपीने पोलिसांकडे दिली आहे.