अहमदनगर: शहरातील येवला रोड परिसरातील श्रद्धा होंडा या दुचाकीच्या शोरूमच्या वर्कशॉपला आग लागून नुकसान झाल्याची घटना रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र मोठे नुकसान झाले आहे.
कोपरगाव शहरातील येवला रोड परिसरात असलेल्या श्रद्धा होंडा दुचाकीच्या शोरूमच्या वर्कशॉपला रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. कोपरगाव नगरपरिषदेचे आपत्ती व्यवस्थापन कार्यपालन अधिकारी संभाजी कार्ले यांनी आपल्या पथकातील संजय विधाते, कार्तिक मालकर, चेतन गव्हाणे, प्रशांत शिंदे यांच्यासह दोन अग्निशम बंब घेऊन काही मिनिटातच घटनास्थळी दाखल होऊन २५ मिनिटाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
या आगीवर वेळेत नियंत्रण मिळविल्याने शोरूमच्या मुख्य इर्मारतीस तसेच नवीन दुचाकींना कोणताही धोका झालेला नाही. मात्र वर्कशॉपच्या शेड व त्यामध्ये बसण्यासाठी असलेली एक कँबीन, दुरुस्तीसाठीचे नवीन स्पेयपार्ट, गाड्यांच्या टाक्यासह वर्कशॉपमधील ईतरही बऱ्याच वस्तू जळून खाक झाल्या आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही.