अहमदनगर /श्रीगोंदा : रेल्वेस्टेशन, बसस्थानकासह विविध ठिकाणी भीक मागणाऱ्या निराधार, अपंग, मतिमंदांचे अपहरण करून त्यांना शेतात राबवून घेतले जात असल्याचा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात पुन्हा एकदा समोर आला आहे़ बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वांगदरी येथील तिघा शेतमालकांच्या तावडीतून सहा जणांची सुटका केली़ याप्रकरणी तिघांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे श्रीगोंदा तालुक्यात मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत असल्याचे समोर आले आहे़ बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वांगदरी परिसरातील अवैध व्यवसायाविरोधात कारवाई करत होते़ यावेळी गावातील शेतमालक कैलास जब्बार गिºहे, करतारसिंग नरहरी गिºहे व विलास सोनाजी गिºहे यांनी जबरदस्तीने काही निराधारांना डांबून ठेवत त्यांच्याकडून शेतातील कामे करून घेतले जात असल्याचे पोलिसांना समजले़ पोलिसांनी तपासणी केली तेव्हा या तिघांच्या शेतात प्रत्येकी दोन जण राबताना आढळून आले़यावेळी पोलिसांनी संतोषकुमार रामचंद्र राजवंशी (वय ४० रा़ रघुनाथपूर मिडकी, कलकत्ता), ओमित कृपासिंधू नसपोर (वय ३० रा़ सायगाहावडा, कलकत्ता), संतोष मेंटोसाला (वय २२), घनश्याम चौधरी, सुनील पोपट मोरे (रा़ पंढरपूर) व सुनील सोपान चव्हाण (वय ४० रा़ म्हाळुंगी ता़ शिरुर) या सहा जणांची सुटका केली़ याप्रकरणी सहाय्यक फौजदार भानुदास नवले यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कैलास, करतारसिंग व विलास यांच्याविरोधात बेकायदेशीर वेठबिगारीस भाग पाडणे (कलम ३७५) प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे़हे तिघे आरोपी फरार आहे़ पोलिसांनी सुटका केलेले संतोष व घनश्याम हे मतिमंद आहेत़ स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आऱपी़ खंडागळे, हेडकॉन्स्टेबल एम़एल़ गाजरे, व्ही़बी़ मखरे, व्ही़एस़ मासाळकर, वाय़ए़ सातपुते, व्ही़एस़ धनेवार, एस़एस़ दरंदले, एम़डी़ गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली़ सुटका करण्यात आलेल्या पाच जणांना विसापूर येथील बेघरांसाठी असलेल्या केंद्रात ठेवण्यात येणार आहे.रेल्वेस्टेशन परिसरातून आणले हे सहा जणपोलिसांनी वांगदरी येथून सुटका केलेल्या सहा जणांना आरोपींनी श्रीगोंदा व दौंड रेल्वे स्टेशन येथून जबरदस्तीने आणले होते़ त्यांच्याकडून शेतातील सर्व कामे करून घेतली जात होती़ या बदल्यात त्यांना काहीच मोबदला दिला जात नव्हता़ तसेच त्यांना पोटभर अन्नही दिले जात नसल्याने पोलिसांनी केलेल्या चौकशीतून समोर आले आहे़तस्करांच्या टोळ्यांचा छडा लावण्याची गरजश्रीगोंदा परिसरात मानवी तस्करी होत असल्याचे समोर आले तरी ही तस्करी करणाºया टोळ्यांचा अद्यापपर्यंत छडा लागलेला नाही़ पोलिसांनी या विषयावर गांभीर्याने काम केले तर या मानवी तस्करीचे रॅकेट समोर येईल़मानवी जिवांची तस्करी आणि छळश्रीगोंदा येथील काही गुन्हेगारांच्या टोळ्या राज्यात विविध शहरात भीक मागणारे, निराधार, अपंग व मतिमंदांना जबरदस्तीने पकडून घेऊन येतात़ जे धडधाकट आहेत त्यांना वीटभट्टीचालक व शेतमालकांना २५ ते ३० हजार रुपयांना विकले जाते़ या लोकांकडून श्रमाची कामे करून घेतली जातात़ त्यांना पुरेसे अन्नही दिले जात नाही़ जे अपंग आहेत त्यांना रेल्वेस्टेशन व बसस्थानक परिसरात भीक मागण्यास सांगितले जाते़ काहींना अपंग केले जात असल्याचेही प्रकार समोर आले आहेत़दोन वर्षांपूर्वी झाली होती कारवाईश्रीगोंदा तालुक्यात मानवी तस्करी करणाºया टोळ्या कार्यरत आहे़ दोन वर्षांपूर्वी श्रीगोंदा पोलिसांनी लोणी व्यंकनाथ परिसरातून पंधरा ते वीस कामगारांची एका शेतमालकाच्या तावडीतून सुटका केली होती़ या मानवी तस्करीविरोधात कुणी तक्रार करत नसल्याने आरोपींवर कारवाई होत नाही‘लोकमत’ने वेधले होते लक्षश्रीगोंदा तालुक्यात होत असलेल्या मानवी तस्करीबाबत ‘लोकमत’ने पोलिसांचे लक्ष वेधले होते़ या तस्करीची कार्यपद्धतीही पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली होती़ त्यानंतर पोलिसांनी घेतलेल्या शोधमोहिमेत वांगदरी येथील प्रकार उजेडात आला़
श्रीगोंदा तालुक्यात मानवी तस्करीचे रॅकेट : वेठबिगारीतून सहा निराधारांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 11:20 AM