सन्मतीवाणीसंतांपुढे नतमस्तक होण्याचा अतिशय चांगला परिणाम आपल्या आयुष्यात दिसून येतो. संतांची योग्य, ज्ञान याचा आदर ठेवून आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. नतमस्तक होणे म्हणजे नम्रता हा गुण अंगी बाळगणे होय. आपल्याला प्रत्येक कामात संतांचे, श्रेष्ठांचे आशीर्वाद घ्यावे लागतात. त्याकरिता आपण गर्विष्ठवृत्तीला दूर सारले पाहिजे. गर्वामुळे खूप नुकसान होते. कोणाशीही चांगले संबंध ठेवता येत नाहीत. गर्वाला हद्दपार करा. मग पाहा जीवन किती सुंदर असते. मन निर्मळ हवं. निर्मळ मनामुळे मानसिक शांतता लाभते. जो माणुस नेहमी नतमस्तक होण्याचा प्रयत्न करतो तोच जीवनात यशस्वी होतो. तपस्येप्रमाणे नतमस्तक होण्यालाही तितकेच महत्त्व आहे. जीवनात नम्रता, लीनता हे गुण हवेतच. वृषभदेवांनी शेतीविषयक मोलाचे मार्गदर्शन केले. कला, संस्कृती शिकविली त्यांचे अनंत उपकार आहेत. संतांच्या शिकवणीपासून आपण ज्ञान घेतले पाहिजे. संत सन्मार्ग दाखवितात संतांचे कार्य महान आहे. संतांच्या अंगी त्यागवृत्ती असते. वंदनीय व्यक्तींचा सहवास, मार्गदर्शन मिळणे दुरापास्त असते. जीवनात गुरुची आवश्यकता असते. जेथे धर्मश्रध्दा जागृत होते तेथे द्वेष नष्ट होतात. गढूळ पाणी शांत झाल्यावर वरचे पाणी नितळ होते. शांतवृत्ती बाळगल्यामुळे मुळ जीवन आनंददायी होते.मनुष्य जन्म दुर्लभ आहे. चांगले काम करा, चांगले बोला, चांगले वर्तन ही त्रिसूत्री अंमलात आणली तर प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नम्रपणा हा गुण श्रेष्ठ आहे. तो प्रत्येकाने अंगी बाळगावा. - पू. श्री. सन्मती महाराज
संतांपुढे नतमस्तक व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 11:17 AM