अहमदनगर : कोरेगाव भीमाची दंगल महाराष्ट्राबाहेरील दोन व्यक्तींमुळे घडली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये फोडण्याचे काम सध्या सुरू आहे. अशा घटनांमुळे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकप्रकारे अवमान झाल्याची खंत आॅल इंडिया अँटी टेरेरिस्ट फ्रंटचे अध्यक्ष तथा पंजाबचे माजी मंत्री मनिंदरसिंग बिट्टा यांनी व्यक्त केली.अहमदनगर येथे शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना बिट्टा म्हणाले, महाराष्ट्रात उमर खलिद आणि जिग्नेश मेवाणी यांचे काय काम होते? हे दोघे महाराष्ट्राच्या एकसंघ भूमिचे तुकडे करायला आले होते का? त्यांना इथे का आणि कोणी बोलविले? महाराष्ट्र हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, यावर देशवासीयांचा विश्वास आहे. मात्र कोरगाव-भीमाच्या दंगलीमुळे त्याला तडा गेल्याची भावना आहे. ही घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचा अपमान आहे. महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करणा-यांना महाराष्ट्रात यापुढे कोणीही बोलावू नये, असेही आवाहन त्यांनी केले. त्यांचे महाराष्ट्रात कार्यक्रम घेतले जाऊ नयेत.आज मी कोणत्याही पक्षात नाही. मी फक्त राष्ट्रहितासाठीच काम करीत आहे. जे देशहिताचे काम करतील, त्यांच्यासोबत आहे. सरदार पटेल, लालबहादूर शास्त्री यांची काँग्रेस आज कुठे राहिली? स्वत:च्या रक्ताने काँग्रेसला सजविणारे आम्ही अनेक कार्यकर्ते त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो. देशाला उल्लू बनविणारे काही लोक देशात आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तर महाठग आहेत. म्हणूनच राष्ट्राचे हित महत्त्वाचे आहे.
कोरेगाव-भीमाच्या दंगलीने महापुरुषांचा अपमान - मनिंदरसिंग बिट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 4:44 PM