अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सव्वाशे शिक्षकांनी बदली प्रक्रियेवर हरकती नोंदविल्या असून, या हरकतींवर सोमवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सुनावणी होणार आहे. बदली प्रक्रियेवर आक्षेप असणाऱ्यांच्या तक्रारींवर एका महिन्यात सुनावणी घेऊन निपटारा करावा, असा आदेश असताना दोन महिन्यानंतर या सुनावणीला मुहूर्त सापडला आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. गैरसोेयीच्या बदल्या झाल्यामुळे अनेक शिक्षक नाराज झाले होते. तर काही शिक्षकांनी आॅनलाईनवर भरलेल्या आॅप्शनपैकी एकही शाळा मिळाली नव्हती. एका शाळेवर दोघांच्या बदल्या झाल्याचेही प्रकार घडले होते़ शाळांचा आॅनलाईन आॅप्शन भरताना जेथे जागा आहेत, अशाच शाळा दिसणे आवश्यक होते़ मात्र, तेथे सर्वच शाळांची यादी येत होती़ त्यामुळे ज्या शाळेवर रिक्त जागाच नाही, अशा शाळांचे आॅप्शनही भरण्यातआले़ त्यामुळे रिक्त शाळा न मिळाल्यामुळे शिक्षकांना समायोजनामध्ये दूरच्या शाळेवर जावे लागले़ यातून काही शिक्षकांच्या गैरसोयी झाल्या़ त्यामुळे शिक्षण विभागाने केलेल्या बदलीप्रक्रियेवर अनेक शिक्षकांनी हरकती नोंदविल्या आहेत़ बदली झाल्यानंतर सात दिवसात हरकती घेऊन त्यावर एका महिन्यात सुनावणी घेण्यात यावी, असा आदेश सरकारने बजावला होता़ मात्र, बदली प्रक्रिया होऊन २ महिने झाले तरी शिक्षकांच्या तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली नव्हती़ आता २१ आॅगस्ट रोजी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी तक्रारदार शिक्षकांच्या अर्जावर सोमवारी (दि़२६) सुनावणी घेण्यात येणार असल्याचे कळविले आहे़ सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात तक्रारदार शिक्षकांनी विहित कागदपत्रांसह सुनावणीस उपस्थित राहण्याच्या सूचना काठमोरे यांनी केल्या आहेत़पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातून सर्वाधिक तक्रारीशिक्षकांच्या बदल्यांवरुन सर्वाधिक तक्रारी पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातून करण्यात आल्या आहेत़ कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्वाधिक ३१ शिक्षकांनी बदल्यांबाबत तक्रारी केल्या आहेत़ त्याखालोखाल अकोले तालुक्यातून २८, पारनेरमधून ९, राहात्यातून २ , शेवगावमधून ६, नगर तालुक्यातून ८, कोपरगावमधून १३, पाथर्डीमधून ६, राहुरीतून १, श्रीगोंद्यातून ७, नेवासातून १०, संगमनेरमधून २ अशा एकूण १२३ शिक्षकांनी बदल्यांबाबत तक्रारी केल्या आहेत़श्रीरामपूर ठरला समाधानी शिक्षकांचा तालुकाबदली प्रक्रियेत असमाधानी असलेल्या शिक्षकांची संख्या सर्वाधिक कर्जत, जामखेड, अकोले तालुक्यात आहे़ मात्र, श्रीरामपूर तालुक्यातील एकाही शिक्षकाचे तक्रारदार यादीत नाव नाही़ त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील सर्व शिक्षक बदल्यांबाबत समाधानी आहेत, असे सांगण्यात येते़ तर राहुरी तालुक्यातील केवळ १ व राहाता आणि संगमनेर तालुक्यातील प्रत्येकी २ शिक्षकांनी बदली प्रक्रियेवर हरकत घेतली आहे़नियोजित कामांमुळे शिक्षकांच्या तक्रारींवर सुनावणी घेण्यास उशीर झाला. या सुनावणीसाठी शिक्षकांना बोलावण्यात आले असून, काही शिक्षकांची नावे यादीत नव्हती. अशा शिक्षकांनाही फोनवरुन याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे बदलीबाबत तक्रार असलेल्या शिक्षकांची संख्या १३० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. - रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी
सव्वाशे शिक्षकांच्या बदल्यांवर हरकती : महिनाभराच्या उशिराने सुनावणीला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 13:36 IST