अहमदनगर : पत्नीवर चाकुने प्राणघातक हल्ला करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करणा-या पतीला जिल्हा न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी शुक्रवारी(दि़२८) हा निकाल दिला. सतीश श्रीराम कसबेकर (वय ३९) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या हल्ल्यात संगीता सतीश कसबेकर ही जखमी झाली होती. सतीश हा जातेगाव फाटा येथे एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत होता. त्याने दुस-या एका महिलेशी लग्न केले होते. या कारणातून संगीता व सतीश यांच्यात भांडण होऊन संगीता ही तिच्या दोन मुलांसोबत माहेरी इंदापूर येथे राहण्यास गेली होती. मुलांना इंदापूर येथे शाळेत प्रवेश घेण्यासाठी त्यांना शाळेचा दाखल घेण्यासाठी पिता म्हणून सतीश याची स्वाक्षरी हवी होती. यासाठी संगीता व तिची मुलगी २५ जून २०१८ रोजी सतीश काम करीत असलेल्या जातेगाव फाटा येथील हॉटेलमध्ये गेली होती. आरोपी संगीताला तो राहतो त्या खोलीत घेऊन जात असताना त्याने तिच्यावर चाकूने हल्ला करून तिला जखमी केले. यावेळी तिच्या मुलीने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी संगीताला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात सतीश कसबेकर याच्याविरोधात संगीता हिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व राजेंद्र भोसले यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने अॅड़ केदार केसकर यांनी काम पाहिले. सरकारी पक्षाच्यावतीने एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. समोर आलेले साक्षीपुरावे व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली. केसकर यांना पैरवी अधिकारी हेड कॉस्टेबल एम़ए़थोरात व आदिक यांनी सहकार्य केले.
पत्नीवर प्राणघातक हल्ला करणा-या पतीला सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 6:04 PM