अहमदनगर : पुणे रस्त्यावरील विनायकनगरमध्ये राहणाऱ्या प्रकाश गुलाबराव रोडे (वय ५७) आणि मीना प्रकाश रोडे (वय ४७) यांचा अज्ञात चोरट्यांनी बुधवारी (दि.१७) मध्यरात्री खून केला. एका लोखंडी टणक वस्तुने डोक्यात घाव घातल्याने दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. पुणे रस्त्यावरील विनायकनगरमध्ये समता कॉलनी असून कॉलनीच्या एका बाजूला शेती आहे. कॉलनीमध्ये रोडे यांचा बंगला आहे. सकाळी अकराच्या सुमारास रोडे यांच्याकडे मोलकरीण आली असता त्यांना घरामध्ये दोघांचे मृतदेह आढळून आले. तिने माजी महापौर भगवान फुलसौंदर यांना ही माहिती कळविली. त्यानंतर ही घटना पोलिसांना समजताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.रोडे यांचा मृतदेह झोपलेल्या अवस्थेतच बेडवर होता. त्यांची झोपलेल्या अवस्थेतील हाताची घडीही विस्कटली नव्हती. डोक्यात टणक वस्तुने घाव घातल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांचे डोके रक्ताच्या थारोळ््यात होते. त्यांची पत्नी मीनाश्री उर्फ मीना यांचा मृतदेह शौचालयात आढळून आला. त्याही रक्ताच्या थारोळ््यात होत्या. त्यांच्याही डोक्यात टणक वस्तुने वार केल्यानेच त्यांचा मृत्यू झाला. शौचालयाच्या बाहेरही रक्त सांडलेले होते. घरामध्ये कपाटातील सामानाची उचकापाचक करण्यात आलेली आहे. देवघरातील चांदीची मूर्ती मात्र तशीच होती. त्यांच्या घरातून काय चोरीला गेले हे सांगण्यासाठी कोणीही नसल्याने चोरीबाबत काहीही कळू शकले नाही.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे, लक्ष्मण काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी) बुधवारी मध्यरात्री खून झाल्यानंतर सकाळी अकरापर्यंत या घटनेची कोणालाही माहिती नव्हती. मोलकरीण भांडे घासण्यासाठी आली त्यावेळी घराचे लोखंडी गेट उघडेच होते. तसेच आतील दरवाजाही उघडाच होता. बाहेर ठेवलेले भांडे मोलकरणीने घासले आणि धुणे मागण्यासाठी आवाज दिला असता आतून काहीही आवाज आला नाही. त्यावेळी तिने घरात जाऊन पाहताच दोघांचा खून झाल्याचे दिसले. चोरटे घराच्या मागील कंपाऊंडवरुन उडी टाकून मागच्या गेटने घरामध्ये शिरले असण्याची शक्यता आहे. मीनाक्षी यांनी दार उघडताच त्यांच्या डोक्यात वार करण्यात आल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली. घरात दोघेच४घरामध्ये प्रकाश आणि मीना रोडे दोघेच राहत होते. त्यांचा मुलगा स्वप्नील हा अमेरिकेत आहे, तर मुलगी कोमल ही पुण्यात शिक्षण घेते. रोडे कुटुंबीय हे मुळचे श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांचे काही नातेवाईक कॉलनी परिसरात राहतात. प्रकाश रोडे हे हवाईदलात नोकरीला होते. ते निवृत्त झाले असून सध्या ते एल अॅण्ड टी कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून काम करीत होते. मयत रोडे दाम्पत्यावर सुरेगाव येथेच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. घटनास्थळी गर्दी४घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, वाय.डी. पाटील यांचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होती. महापौर संग्राम जगताप, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक गणेश भोसले, अजिंक्य बोरकर, बाळासाहेब पवार आदींनी घटनास्थळी भेट दिली. मयत रोडे कुटुंबीय हे अॅड.अनुराधा येवले यांचे नातेवाईक आहेत.
विनायकनगरमध्ये पती-पत्नीचा खून
By admin | Published: September 18, 2014 11:40 PM