टाकळी ढोकेश्वर : जिल्ह्यातील विविध नदीपात्रांमध्ये पोकलेनसह इतर यंत्रांच्या साह्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात असून हा वाळू उपशाचा तमाशा महसूल विभागाने तातडीने बंद करावा. अन्यथा दहा दिवसात त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला. तसेच ज्या आमदारांचा वाळू उपशाशी संबंध नाही, त्यांनी आपापल्या तालुक्यात तहसीलसमोर उपोषण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
टाकळी ढोकेश्वर येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार विखे बोलत होते. विखे म्हणाले, या अवैध वाळू उपसा विरोधात महसूल विभागाने कारवाई न केल्यास त्याचे पडसाद विधानसभेत, लोकसभेत उमटतील. सध्या कोरोनाचे निर्बंध सर्वसामान्यांवर असून या वाळू व्यवसायावर कोरोनाचे कोणतेही निर्बंध नाही. वाळू उपशाचे व्हिडिओ शूटिंग, जीपीएसचे लोकेशन असे सर्व सबळ पुरावे आमच्याकडे असून ते जिल्हाधिकाऱ्यांना दोन दिवसात सादर करणार असल्याचे विखे यांनी सांगितले. यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, सभापती गणेश शेळके, दूध संघाचे माजी अध्यक्ष राहुल शिंदे, अरुण ठाणगे हे उपस्थित होते.
महसूल विभागाच्या वतीने अनेक ठिकाणी वाळू ठेक्यांचे लिलाव केले असून या ठिकाणी पोकलेनच्या साह्याने अवैध वाळू उपसा केला जात आहे. त्यामुळे महसूल विभागाने तातडीने पोकलेन जप्त करावे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची दोन दिवसांत भेट घेऊन या यासंबंधी सर्व माहिती त्यांच्यासमोर पुराव्यानिशी मांडणार आहे. त्यांना कारवाईसाठी ७ दिवसांचा कालावधी देणार आहे. तसेच यावर ठोस कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासह तालुकानिहाय लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन उपोषण करण्याचा इशारा विखे यांनी दिला आहे.
...............
वाळू तस्करीविरोधात लक्षविरहित लढाई
प्रत्येक आमदाराने अथवा लोकप्रतिनिधींनी जर वाळू ठेक्याशी त्यांचा काही संबंध नसेल तर तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसावे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आशीर्वाद घेऊन आपण वाळू तस्करीविरोधात लढा उभारणार आहे. एक पक्षविरहित लढाई म्हणून या वाळू तस्करीच्या विरोधात उपोषण करणार असल्याचे खासदार विखे यांनी सांगितले.
............
विखे यांचे थेट थोरातांनाच आव्हान
वाढत्या वाळू तस्करीवरुन विखे यांनी थेट राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. या अवैध वाळू उपशामुळे जिल्ह्याचे व संगमनेर तालुक्याचे राजकारण नासले असल्याची टीका विखे यांनी केली. तसेच संगमनेर असो किंवा अन्य कोणताही तालुका जर लोकप्रतिनिधींचा वाळू तस्करीशी काहीही संबंध नसेल तर त्यांनी उपोषणात सहभागी व्हावे, असे थेट आव्हानच विखे यांनी थोरात यांना दिले आहे.
.............
फोटो ओळी -
टाकळी ढोकेश्वर येथे पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे खासदार सुजय विखे. समवेत सुजित झावरे, गणेश शेळके आदी.