संगमनेर : कॉँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. दोन महिन्यांपासून अठरा तासांपेक्षा अधिक काम करतो आहे. सर्व टप्पे यशस्वीपणे पार करतो आहे. बडे लोक सोडून गेलेत. आता कॉँग्रेस पक्षाचे काय होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, पक्षाची वाटचाल प्रभावीपणे सुरू आहे. कॉँग्रेसचे सर्वच उमेदवार दमदार असून मी बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखे लढतो आहे, असे प्रतिपादन कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर, शिर्डी येथील सुरेश थोरात, श्रीरामपूर मतदारसंघातील लहू कानडे यांच्या प्रचारार्थ निझर्णेश्वर येथे मंगळवारी दुपारी (८ आॅक्टोबर) कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीच्या विजयी निर्धार सभेत प्रदेशाध्यक्ष थोरात बोलत होते. ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य अडचणीत असताना बाजीप्रभू देशपांडे यांनी खिंड लढविली. स्वराज्य वाचविले. संकटाच्या काळात बाजीप्रभू उभे राहिले. त्याचप्रमाणे मी देखील पक्षाच्या कठीण काळात लढतो आहे. राजकारण करताना केवळ पदासाठी कधीही राजकारण करीत नाही. सहकारमहर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्वांनुसार वाटचाल करतो आहे. काँग्रेस उठली की दणकून उठते हा इतिहास आहे. २४ आॅक्टोबरला गुलाल आपलाच असून मुख्यंमत्री कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीचाच होणार आहे, असा विश्वास देखील प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी व्यक्त केला.
मी बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखे लढतो आहे-बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 4:43 PM