अहमदनगर/नाशिक - राज्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. राज्यात सर्वांचंच लक्ष लागलेल्या आणि सर्वाधिक चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात आज अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी मतदानाचा हक्क बजावला. सत्यजीत तांबे यांनी संगमनेर येथील मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना आपला विजय निश्चित असल्याचं ते म्हणाले. यावेळी, नाशिक मतदारसंघात आणि काँग्रेसमध्ये झालेल्या राजकारणाचाही उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.
नाशिकच्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे, काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण, सुधीर तांबे यांनी अर्ज माघारी घेतला, दरम्यान तांबे यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरुन नाशिक पदवीधर निवडणुकीत उडी घेतली आहे. दरम्यान, भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तांबे यांना पाठिंबा दिला आहे, या संदर्भात आज मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सत्यजित तांबे यांनी माध्यमांशी बोलताना आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाच नव्हता, असा गौप्यस्फोट केला. त्यामुळे, सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मी अपक्ष उमेदवार आहे, भविष्यातही मी अपक्षच राहीन. मात्र, गेल्या काही दिवासंमध्ये माझ्या परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही इतकी वर्षे काँग्रेस पक्षात असल्यामुळे या सगळ्यावर प्रतिक्रिया किंवा प्रत्युत्तर दिले नाही. पण, मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला ही माहिती चुकीची आहे. मी फॉर्म भरताना काँग्रेसचा उमेदवार म्हणूनच अर्ज भरला होता. तीन वाजेपर्यंत मला एबी फॉर्म मिळाला नाही. त्यामुळे माझा फॉर्म अपक्ष म्हणून कन्व्हर्ट झाला. त्यामुळे मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याच्या बातम्या खोट्या आहेत, असा गौप्यस्फोटच तांबे यांनी केला.
सत्यजीत तांबे यांना कोरा एबी फॉर्म देऊनही त्यांनी अपक्ष उमेवारी अर्ज भरला, हा प्रचार खोटा आहे. काँग्रेसमधील काही नेते अर्धसत्य सांगत आहेत. मी योग्य वेळ आल्यावर पूर्ण सत्य सांगेन, तेव्हा सगळे चकित होतील. राजकारणात योग्य वेळ कधी येईल, ते सांगता येत नाही, असेही सत्यजीत तांबे यांनी म्हटले. त्यामुळे, आता निकालानंतर सत्यजीत तांबे कोणावर निशाणा साधणार हे पाहावे लागेल.
स्थानिक भाजपचा तांबेंना पाठिंबा
सत्यजीत तांबे यांनी भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेतली. माझ्याशी त्यांनी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. पक्षाने पाठिंबा जाहीर केल्याचे मला आठवत नाही. पण, सत्यजीत तांबे यांना निवडून आणण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने शिवसेनेच्या शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. तर, काँग्रेसने सुधीर तांबे यांच्यावर कारवाई केल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, गेल्या १३ वर्षापासून नाशिक पदवीधर मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात असून यंदाही काँग्रेस विजयी होईल असं मानलं जात होते. परंतु सुधीर तांबे यांनी अखेरच्या क्षणी पुत्रासाठी माघारी घेत सत्यजित तांबेंना अपक्ष म्हणून पुढे केले. त्यामुळे काँग्रेसला फटका बसला. तांबेंनी पक्षाची फसवेगिरी केली असा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला. त्यात या संपूर्ण घडामोडीत सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात कुठे होते असा प्रश्न उभा होत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी तांबेंना भाजपाकडून उमेदवारी नको, म्हणून बाळासाहेब थोरातांनी भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याला फोन करून विनंती केल्याचं सूत्रांच्या हवाल्याने समोर आले आहे.