राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी परिवारासह देशाला गरज आहे. त्यामुळे, अण्णांनी वाढते वय व विविध व्याधींचा विचार करता नवी दिल्ली येथे उपोषण न करता काही तरी वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करावे, असा भावनिक आग्रह राळेगणसिद्धी येथे ग्रामसभेत ग्रामस्थांनी अण्णांकडे धरला. त्यावर उपोषणाने मी मरणार नाही अन् सरकारमध्ये मला मरू देण्याची हिमंत नाही, असे सांगत अण्णा हजारे यांनी नवी दिल्ली येथे २३ मार्चपासून उपोषण आंदोलन करण्याचा निर्धार कायम ठेवला.नवी दिल्ली येथील लोकपाल, शेतक-यांचे प्रश्न व निवडणूक सुधारणा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धी येथे शनिवारी रात्री यादवबाबा मंदिरात ग्रामसभा झाली. यावेळी हजारे बोलत होते. हजारे पुढे म्हणाले, शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने गेल्या वीस वर्षांत देशात लाखो शेतक-यांनी आत्महत्या केल्या. राज्यात विदर्भ व मराठवाड्यात आत्महत्यांचे प्रमाण जास्त असून संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात शेतक-यांच्या आत्महत्यांचा प्रश्न दिसून येतो. राज्यात कृषिमूल्य आयोग असून त्याचा अहवाल केंद्राला जातो. राज्य व केंद्राच्या कृषिमूल्य आयोगाला स्वतंत्र करून स्वायत्तता द्या. त्यावर तज्ज्ञ शेतक-यांची नेमणूक केली पाहिजे. नैसर्गिक संकटात शेतकºयांचा विमा मंडलामार्फत न करता वैयक्तिक स्वरूपाचा काढावा. शेतक-यांना ६० वर्षांनंतर निवृत्ती वेतन मिळायला हवे. लोकपाल कायद्याची अमंलबजावणी करण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्लक्ष केले असून हा कायदा कमजोर करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही अण्णांनी केला.यावेळी सरपंच रोहिणी गाजरे, उपसरपंच लाभेश औटी, गंगाभाऊ मापारी, सुरेश पठारे, दादा पठारे, डॉ. धनंजय पोटे, शरद मापारी, माजी सरपंच जयसिंग मापारी, राजाराम गाजरे, अरूण भालेकर आदींची भाषणे झाली. याप्रसंगी डॉ.गणेश पोटे, माजी सरपंच मंगल मापारी, प्रभावती पठारे, संगीता पठारे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.
कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता द्यावी
देशातील शेतक-यांच्या पिकाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळाला तर शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यासाठी कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. अण्णांच्या नवीदिल्ली येथील उपोषण आंदोलनस्थळी राळेगणसिद्धी परिवारातील सुरेश पठारे, दादा पठारे, सुनील हजारे व डॉ. धनंजय पोटे आदी उपस्थित राहतील, असा ठराव ग्रामसभेत झाला.