चांंदेकसारे : कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे अवैध धंदे सुरू असल्याच्या अनेक तक्रारी आल्या. अवैद्य दारू विक्रीमुळे भांडणे होतात. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. शिर्डी पोलीस स्टेशन दारू विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करेल. पोहेगाव परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांची मुळीच गय केली जाणार नाही, असा इशारा शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिला.
पोहेगाव परिसरातील अवैध दारू विक्री, मटका जुगार असे अवैध धंदे बंद करण्यासाठी शनिवारी सकाळी पोहेगाव येथे गाव बंद ठेवून ग्रामसभा घेण्यात आली. अनेक महिलांनी ग्रामसभेत अवैद्य व छुप्या पद्धतीने दारू विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. पोहेगाव ग्रामपंचायतीच्या वतीनेही शिर्डी पोलीस स्टेशनला हे अवैध धंदे बंद करण्यासाठी निवेदन देण्यात आले. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक लोखंडे म्हणाले, पोहेगाव येथे दारूबंदी आहे. मात्र छुप्या पद्धतीने दारू विक्रीच्या तक्रारी शिर्डी पोलीस स्टेशनकडे आल्यानंतर संबंधित व्यक्तीवर पोलीस स्टेशनने कारवाई केली आहे. अजूनही पोहेगाव परिसरात अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस तपासात जर कोणी अवैध व्यवसाय करत असल्याचे लक्षात आले तर शिर्डी पोलीस स्टेशन त्या व्यक्तीवर कडक कारवाई करेल, असे त्यांनी सांगितले.