महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक, वाहक म्हणून इमानेइतबारे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. ‘कोरोनाने पाच महिन्यांपूर्वी आई गेली’ असे सांगत असताना एका तरुण चालकाला अचानक भरून आले. त्याच्या डोळ्यांत अश्रू होते. माझ्यासह कुटुंबातील सर्वांनाच कोरोनाची लागण झाली होती. वैद्यकीय उपचारांसाठी झालेला खर्च माझ्यासाठी अधिक होता. सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनदेखील अजूनही वैद्यकीय बिल मिळालेले नाही, त्यामुळे पाठपुरावा करतो आहे, असे या चालकाने सांगितले.
परिवहन महामंडळातील वाहक, चालकांनी आपल्या व्यथा नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर बोलून दाखविल्या. संगमनेर आगारातील काही वाहक, चालकांच्या आरोग्याशी असलेल्या समस्यांमुळे, कोरोना झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. त्यापैकी काहींची वैद्यकीय बिले अद्यापही मिळाली नसल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत फारच कमी आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आम्हालादेखील सेवासुविधांचा लाभ मिळावा. ‘दोन महिन्यांपासून पगार नव्हते, सप्टेंबर महिन्यात दोन टप्प्यांत पगार झाले. कोरोना काळात अनेकदा पगार उशिराने झाले. आता पुढे काय होते देव जाणो’ अशी काळजीही परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना लागून आहे.
---------------
जिल्ह्यातील एकूण एसटी आगार -: ११
एकूण कर्मचारी -: ४ हजार ३००
----------
गेल्या दीड ते पावणेदोन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालक, वाहकांची वैद्यकीय बिले मिळालेली नाहीत. पगार वेळेवर नाहीत, त्यात वैद्यकीय बिलेदेखील मिळत नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी काय करायचे? कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे, आरोग्याशी निगडित समस्येचे असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर आहेत.
-डी. जी. अकोलकर, विभागीय सचिव, अहमदनगर विभाग, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना
---------
कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात उपचार घेतले. कोरोनामुळे मे महिन्यात आईचे निधन झाले. केलेल्या वैद्यकीय उपचारांचे बिल संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा केले आहे. मात्र, अजूनही ते मिळालेले नाही.
-चालक, संगमनेर आगार
-----------
कोरोना काळात अत्यावश्यक सेवा म्हणून आम्ही इतर राज्यांतील नागरिकांना त्यांच्या गावात सुखरूप पोहोचविले होते. अत्यावश्यक सेवा म्हणून आमच्याकडे पाहिले जाते; परंतु आमच्यापैकी अनेकांचे अजूनही कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण झालेले नाही. अत्यावश्यक सेवेप्रमाणे आम्हाला वेतन आणि इतर कुठल्याही सुविधा मिळत नाहीत.
नंदकुमार सदाशिव कानकाटे, वाहक, संगमनेर आगार
---------
कोरोनामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उत्पन्न घटले आहे. फेऱ्यांची संख्या कमी आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वैद्यकीय बिलांसंदर्भात पाठपुरावा सुरू आहे.
विजय गिते, विभाग नियंत्रक, अहमदनगर विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
..................
STAR 1177