शेखर पानसरे
संगमनेर : मी पालकत्व कसे करावे, हे मला कुणी शिकविण्याची गरज नाही, असा टोला महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांना नाव न घेता लगावला. पालकमंत्री त्रास द्यायला नसतात. त्यांनी नेहमी पालकांच्या भूमिकेत असावे. अशी टीका नाव घेता आमदार थोरात यांनी महसूलमंत्री विखे यांच्यावर केली होती. त्या टीकेला विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
बुधवारी (दि.२०) महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विखे-पाटील संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. शारदा लॉन्स येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमावेळी त्यांनी आमदार थोरात यांच्यावर टीका केली. आमदार थोरात यांनी सोमवारी (दि. १८) संगमनेरातील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील सभागृहात संगमनेर तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती संदर्भात टंचाई आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीला प्रांताधिकारी आणि तहसीलदार हे दोन्ही प्रमुख अधिकारी अनुपस्थित असल्याने आमदार थोरात चांगलेच संतापले होते. पालकमंत्री त्रास द्यायला नसतात. त्यांनी नेहमी पालकांच्या भूमिकेत असावे. तुम्ही जिल्ह्यात आल्यानंतर तुम्हाला अधिकारी सतत समोर पाहिजेत का? अशी टीका आमदार थोरात यांनी महसूलमंत्री विखे-पाटील यांचे नाव न घेता केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये टीका-प्रतिटिका सुरू झाली आहे.