Anna Hazare ( Marathi News ) : शिखर बँक घोटाळा प्रकरणातील क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आव्हान दिल्याची बातमी समोर आली होती. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी पुन्हा वाढणार अशा चर्चा सुरू होत्या. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी अण्णा हजारे यांच्यावर जोरदार टीका केल्या होत्या.दरम्यान, आता या प्रकरणावर स्वत: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'त्या क्लिन चीट विरोधात माझा कोणताही अर्ज नाही', असं स्पष्टीकरण अण्णा हजारे यांनी दिले आहे.
आज टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे क्लिन चीट विरोधातील आव्हानावर बोलताना म्हणाले, मला याबाबत काही माहिती नाही, मी वर्तमानपत्रात पाहिलं तर माझ नाव होतं. मी काहीही बोललं नाही, तरीही माझ नाव बघून मला धक्का बसला. माझ्या नावाचा दुरुपयोग करुन काही लोक स्वार्थ साधतात. अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असंही अण्णा हजारे म्हणाले. पंधरा वर्षापूर्वी या प्रकरणावर आवाज उठवला होता. आता यावर येत आहे. क्लिन चीटवर बोलताना हजारे म्हणाले, लोकांना माहित असेल तर बोलतील. मला यातलं काही माहितच नाही मग कसं बोलणार, असंही अण्णा हजारे म्हणाले.
क्लिन चीट विरोधात आव्हान देणार?
अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याविरोधात शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी कोणतेही पुरावे नाहीत, असे सांगून मुंबई पोलिसांनी जानेवारीमध्ये न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. दरम्यान आता त्याच प्रकरणातील क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आव्हान देण्याचा निर्णय घेतला असल्याच्या काल बातम्या समोर आल्या होत्या. शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या मुंबई पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला असल्याचेही यात म्हटले होते.
राष्ट्रवादीकडून टीका
आ प्रकरणावरुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरज चव्हाण यांनी अण्णा हजारे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करत टीका केली आहे. "अनेक यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी झाल्यानंतर त्याच्यात काही निष्पन्न झालं नाही. मग त्यावरती क्लोझर रिपोर्ट सादर करण्यात आला. न्यायालयीन प्रक्रिया असो की चौकशीची प्रक्रिया असो, त्या दोन्ही गोष्टी आम्ही क्लिअर केल्या होत्या. त्यानंतर तो क्लोझर रिपोर्ट केला होता. बारा महिने कुंभकर्णासारखं झोपणारे अचानकपणे जागृत होऊन अशी मागणी करतात. मला वाटतं या स्वयंघोषित समाजसेवकाचा बोलवता धनी कोणतर आहे, यांची नार्को टेस्ट आधी झाली पाहिजे, अशी मागणीही राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी केली.