संगमनेर : काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे पाटील हे गेल्या पाच वर्षात कसे वागले. हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना मी त्यांना पाहिले आहे. त्यामुळे त्यांनी वापरलेला शब्द हा त्यांच्यासाठीच योग्य आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
राज्यातील सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना कोणीही विचारत नसून ते लाचारासारखे कसे सत्तेत सहभागी आहेत. याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटत आहे. प्रदेशाध्यक्षांना कुणी विचारत नाही, अशी टीका भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसवर केली होती. यावर महसूलमंत्री थोरात यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनीही माजीमंत्री आमदार विखे यांनी केलेल्या टिकेला जोरदार प्रत्तुतर दिले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी ( १९ जून) कोरोनासोबत लढा देणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, पत्रकार आदीचा सत्कार मंत्री थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते.