अहमदनगर : नागराज मंजुळे यांचा "झुंड" चित्रपट पाहण्यासाठी आयुष्यात पहिल्यांदा चित्रपटगृहात आलो. झोपडपट्टीतील व सर्वसामान्य मुले कशी प्रगती करू शकतात हा मोठा सामाजिक संदेश या चित्रपटाने दिला आहे, असे आमदार निलेश लंके म्हणाले.
मंजुळे यांच्या "झुंड"चा गुरुवारी रात्री अहमदनगर शहरात प्रीमिअर शो होता. हा शो पाहण्यासाठी स्वतः मंजुळे, आमदार लंके, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले उपस्थित होते. यावेळी लंके यांनी "झुंड"चे कौतुक केले. ते म्हणाले, 'हा सिनेमा सर्वसामान्य व समाजाने उपेक्षित ठेवलेल्या माणसांना नवी दिशा दाखवतो. आपण आजवर कधीच सिनेमगृहात आलो नाही. सिनेमागृहात येऊन पाहिलेला हा माझ्या आयुष्यातील पहिला सिनेमा आहे'.
मंजुळे यांनीही लंके यांच्या कामाचे कौतूक केले. लंके यांनी कोविडमध्ये केलेले काम अफलातून होते. माझ्या आयुष्यातील पहिला सिनेमा मी अहमदनगरमध्ये बनविला. या शहराशी आपले नाते असून येथे एक घरच घ्यावे वाटते असे मंजुळे म्हणाले.
जिल्हाधिकारी भोसले म्हणाले, या चित्रपटाने मोठा सामाजिक संदेश दिला आहे. ते अखेरपर्यंत चित्रपटगृहात शेवटच्या रांगेत बसून होते.
नागराज यांसह झुंडमधील अंकुश गेडाम, बाबु छेत्री, सायली पाटील, भुषण मंजुळे, भारत मंजुळे, कुतुब इनामदार, पुजा चौधरी, प्रियंका दुबे ही टीम त्यांच्या समवेत होती.'लोकमत'चे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, शीतल जगताप, पोलीस निरीक्षक अनिल कटके, संपत शिंदे यांचीही यावेळी उपस्थिती होती. सह्याद्री मल्टिसिटीचे संदीप थोरात व पत्रकार समीर दाणी यांनी या शोचे आयोजन केले होते.