अहमदनगर : नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथील नियोजित पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या उभारणीला व जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीला राज्याच्या महसूल व मदत पुनर्वसन मंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविल्याची माहिती माजी खासदार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके यांनी दिली.नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथील ८० एकर जमीन ग्रामस्थांनी मोफत पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राला दिली. मागील वर्षी त्या जमिनीचे पुणे विद्यापीठाच्या नावाचे हस्तांतरणही झाले. मात्र जमीन देऊनही याठिकाणी उपकेंद्राच्या कामाला सुरुवात करण्यास पुणे विद्यापीठाच्या वतीने चालढकल सुरू असल्याचे गावकऱ्यांनी शेळके यांच्या कानावर घातले. शेळके यांनी यासंदर्भात आज शिष्टमंडळासह मुंबईत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचे काम सुरू करण्याची मागणी केली. यावेळी थोरात यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर उपकेंद्राच्या कामाला त्वरित गती देण्याचे आश्वासन दिले तसेच शेळके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांची भेट घेऊन जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थितीची माहिती दिली. शेळके म्हणाले की, जिल्ह्यात अकोले तालुका वगळता इतरत्र कुठेच पाऊस नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाअभावी खरीप हंगामही हातचा गेला. यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून जनावरांच्या चाऱ्यासाठी छावण्या अथवा चारा डेपो सुरू करण्याची मागणी शेळके यांच्या शिष्टमंडळाने केली. त्यासही पतंगराव कदम यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. शेळके यांच्या शिष्टमंडळात सर्वश्री ज्ञानदेव दळवी, संपतराव म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, जनार्दन माने, प्रताप शेळके आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
छावण्या, विद्यापीठ उपकेंद्राबाबत विचार
By admin | Published: August 05, 2014 11:30 PM