अहमदनगर : युवा सांसदच्या माध्यमातून शिक्षण, शेती, कोरोना संकट, सद्यस्थितीच्या उपाययोजना, शासनाचे धोरण युवकांमध्ये वैचारिक देवाण-घेवाण होत असून, त्यामुळे युवासांसद ही स्पर्धा महत्त्वपूर्ण असल्याचे नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात यांनी सांगितले.
भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र आयोजित जिल्हास्तरीय युवा सांसद स्पर्धा खरात यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
टिळक रोड येथील नेहरू युवा केंद्राच्या कार्यालयात ही स्पर्धा पार पडली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाप्रसंगी जय युवाचे अध्यक्ष अॅड. महेश शिंदे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक अमोल बागुल, उडान फाउंडेशनच्या अध्यक्ष आरती शिंदे, द युनिव्हर्सल फाउंडेशनच्या सचिव आदिती उंडे, सागर अलचेट्टी, नर्मदा फाउंडेशनचे सुनील महाराज तोडकर, दिनेश शिंदे, रमेश गाडगे, सिद्धार्थ चव्हाण आदी उपस्थित होते.
आजची युवा पिढी वाचन व संस्काराअभावी भरकटत चाललेली आहे. राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र सातत्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून युवकांचे नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. युवा सांसदच्या माध्यमातून वक्तृत्व विकसित होणार असल्याची भावना आरती शिंदे यांनी व्यक्त केली.
अॅड. सुनील महाराज तोडकर म्हणाले, ‘‘आजचा युवक मोबाइलच्या विळख्यात गुरफटलेला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी युवा सांसदसारख्या उपक्रमाची गरज आहे. युवकांमध्ये वैचारिक बदल घडले पाहिजे. स्पर्धेतून युवक-युवतींना आपले गुण-दोष लक्षात येतात. खेळाडू वृत्ती जपली जाते.’’ युवा सांसदचे परीक्षण अमोल बागुल, अॅड. महेश शिंदे, आदिती उंडे, आरती शिंदे, अॅड. सुनील तोडकर यांनी केले. स्वागत दिनेश शिंदे यांनी केले. आभार रमेश घाडगे यांनी मानले.
३१ नेहरु युवा केंद्र
जिल्हास्तरीय युवा सांसद स्पर्धेप्रसंगी जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, समवेत महेश शिंदे, आरती शिंदे, आदिती उंडे, सागर अलचेट्टी, सुनील महाराज तोडकर आदी. (छाया-वाजिद शेख-नगर)