अहमदनगर : नगर शहरात हेल्मेट आणि सीटबेल्ट सक्ती प्रशासनाने चांगलीच मनावर घेतल्याचे दिसत आहे़ हेल्मेट न वापरणारे मोटारसायकल चालक व सीटबेल्ट न लावणाऱ्या चारचाकी वाहनचालकांचा आता परवानाच रद्द करा, असा आदेश सोमवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत दिला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांच्यासह परिवहन, सार्वजनिक बांधकाम, महापालिका आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शहरासह संपूर्ण जिल्ह्यात हेल्मेट सक्तीबाबत तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश या बैठकीत पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाला देण्यात आले़ महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची सुरक्षाविषयक स्थिती जाणून घेण्यासाठी त्रयस्थ यंत्रणेकडून पाहणी करुन अहवाल मागवला जाणार आहे. त्याअनुषंगाने आलेल्या सूचनांचा विचार करुन कार्यवाही करण्यात येणार असल्याचे द्विवेदी यांनी स्पष्ट केले. महापालिका हद्दीतील तसेच महामार्गावर काही ठिकाणी असणारे रस्ता दुभाजकांची मोडतोड झाल्याचे चित्र आहे. त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शहरात सध्या वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालवणाºया चालकांवर कारवाई करण्यात येत आहे.१ ते १५ डिसेंबर या कालावधीत सीटबेल्ट नसणाºया १ हजार १८७ वाहनचालकांवर आणि दुचाकी चालविताना हेल्मेट नसणाºया १ हजार ५०१ वाहनचालकांवर दंडाची कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली़ मात्र, अशा वाहनचालकांचा परवानाही निलंबित करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी यावेळी दिले़ सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ७ ते रात्री ९ या कालावधीत हेल्मेट न वापरणाºयांवरील कार्यवाही गतिमान करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले़..तर अपघाताची जबाबदारी साखर कारखान्यावर४साखर कारखान्यांनी करार केलेल्या सर्व वाहनांनी रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी न करणाºया कारखान्यांच्या वाहनांकडून अपघात झाल्यास संबंधित कारखान्यांना जबाबदार धरले जाईल, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत़
हेल्मेट नसेल तर वाहनांचा परवानाच रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 3:20 PM