सत्तेत नसतात तर तुमच्यासोबत ५ आमदारही आले नसते; शरद पवारांसमोरच नेत्याचा अजितदादांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 04:44 PM2024-01-03T16:44:09+5:302024-01-03T16:46:58+5:30
ईडीचा धाक आहे म्हणून तुमच्या बरोबर आमदार आले आहेत, अशी टीकाही यावेळी अजित पवारांवर करण्यात आली.
Ajit Pawar Vs Sharad Pawar Faction ( Marathi News ) : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय शिबीर शिर्डी इथं पार पडत आहे. या शिबिरात शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीतून बंड केलेल्या अजित पवार यांच्या गटावर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनीही अजित पवार गटावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. "पवार साहेबांना आमदार दबावापोटी सोडून गेले, हे प्रेमापोटी कोणी गेलं नाही. जर तुम्ही सत्तेच्या बाहेर असता तर तुमच्या सोबत ५ देखील आमदार आले नसते, पण तुम्ही सत्तेबरोबर आहात, ईडीचा धाक आहे म्हणून तुमच्या बरोबर आमदार आले आहेत. आज इथे जे कार्यकर्ते थांबलेले आहेत ते शरद पवारांच्या विचारांनी थांबलेले आहेत," असा हल्लाबोल शेख यांनी केला आहे.
अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडताना महेबूब शेख यांनी पुढं म्हटलं आहे की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ५४ आमदार निवडून आले ते फक्त शरद पवार साहेबांच्या चेहऱ्याकडे बघून निवडून आलेत. आता काही लोक सांगतात की, साहेबांनी ३८ व्या वर्षी निर्णय घेतला, आम्ही ६० व्या वर्षी निर्णय घेतला. यांनी जर ३८ व्या वर्ष निर्णय घेतला असता तर सरपंच तरी त्यांच्याबरोबर आला असता का? शरद पवार साहेबांनी ३८ व्या वर्षीच्या वेळी निर्णय घेतला त्यावेळी परिस्थिती तशी होती आणि एका वृत्तपत्राला बातमी होती की, हे सरकार जावे ही श्रींची इच्छा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची याला परवानगी होती. त्या परवानगीने घरात कोणताही राजकीय वारसा नसताना स्वतःच्या हिंमतीवर ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री असायला शरद पवार व्हावे लागते," असा टोला शेख यांनी लगावला आहे.
"पक्षावर दावा केला म्हणून कोणी शरद पवार होत नसतो"
महेबूब शेख यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर आजच्या शिबिरात अत्यंत आक्रमकपणे अजित पवार गटाचा समाचार घेतला. ते म्हणाले की, "नकली फुले केसात माळून शरीरात वसंत येत नसतो, पांढरे केस काळे केले म्हणून कोणी तरुण होत नसतो आणि पक्षावर दावा केला म्हणून कोणी शरद पवार होत नसतो. जर तुम्हाला शरद पवार व्हायचं असेल तर सत्ता गेली तरी बेहत्तर ज्या महामानवाने देशाचे संविधान लिहिले त्या महामानवाचे नाव मी मराठवाडा विद्यापीठाला देईल हा निर्णय घ्यावा लागतो, तुम्हाला जर शरद पवार व्हायचे असेल तर मंडळ आयोगाच्या विरोधात निघालेली कमंडल यात्रा निघालेली असताना देखील मंडल आयोगाची अंमलबजावणी करून २७ टक्के ओबीसी समाजाला आरक्षण देण्याचे काम तुम्हाला करावे लागते, म्हणून मला तुम्हा सर्व युवकांना एवढंच सांगायचं आहे की, आपल्याकडे काळ कमी आहे आपल्याला सर्वांना पुढचे नऊ महिने प्रत्येक गावात प्रत्येक भूत वर जाऊन सकाळपासून रात्रीपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रत्येक गावागावांमध्ये शाखा तयार करायच्या आहे. शरद पवार साहेबांचे काम कानाकोपऱ्यात पोहोचवायचे आहे आणि यासाठी पुढचे नऊ महिने प्रत्येकाने माझ्यासहित झोकून देऊन आपल्याला काम करायचे आहे," असं आवाहन शेख यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केलं आहे.