अहमदनगर : राज्य शासनाने घोषणा केल्याप्रमाणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, मंदिरे १६ नोव्हेंबरपासून उघडली आहेत. मात्र मंदिरांमध्ये ६५ वर्षांवरील व्यक्तींना तसेच १० वर्षाखालील मुलांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. दोन भक्तांमध्ये सहा फुटाचे अंतर राहील, असे दर्शन रांगेत नियोजन करण्याचा आदेशही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. मंदिरांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियमावली जाहीर केली असून त्याचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे दिवाळी पाडव्यापासून जिल्ह्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे उघडण्यात आली आहे. सोमवारी सुटी असल्याने जिल्हा प्रशासनाने १७ नोव्हेंबरा एका आदेशाद्वारे मंदिर व्यवस्थापनांना एक नियमावलीच तयार करून दिली आहे. मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे, सॉनिटायझर वापरणे भाविकांना अनिवार्य करण्यात आले आहे. मंदिरांमध्ये कोणत्याही प्रकारे प्रसादाचे वाटप केले जाणार नसून भाविकांनाही फुल, हार, नारळ अशा वस्तू अर्पण करता येणार नाहीत. या आदेशामध्ये जाहीर करण्यात आलेली नियमावलीमध्ये तब्बल १८ नियमांचे पालन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यातील काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.
----------
असे आहेत नियम
कमीत कमी सहा फुटाचे अंतर राखणे
मास्क, सॉनिटायझरने वारंवार हात धुणे
प्रवेशद्वारावर सॉनिटायझर, थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था
आजाराची लक्षणे नसलेल्यांनाच प्रवेश
मास्क असेल तरच मंदिरात प्रवेश
प्रतिबंधात्मक उपायांवरील फलक लावणे
जनजागृतीसाठी ऑडिओ, व्हीडिओ क्लीप लावणे
पादत्राणे गाडीतच ठेवावीत
रांगांमध्ये शारीरिक अंतराच्या खुना आवश्यक
हात-पाय साबणाने स्वच्छ धुणे बंधनकारक
पुतळे, मूर्ती, ग्रंथांना स्पर्श करण्यास मनाई
गायन-भजन गटांना परवानगी नाही
अन्नदान करताना नियमांचे पालन आवश्यक
मंदिरातील कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी आवश्यक
अंतरानुसार दर्शनासाठी दिवसाला संख्या निश्चत करणे
-----------------
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना शंभर रुपये दंड
धार्मिक व प्रार्थना स्थळे, मंदिर परिसरात कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत तयार करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास शंभर रुपये दंड वसूल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पोलीस यंत्रणेला दिला आहे. मास्क न वापरणे, थुंकणे, धुम्रपान करताना आढळल्यास शंभर रुपये दंड करण्यात येणार आहे. तसेच धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाने सर्व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे व त्याचे काटेकोर पालन होईल, याची दक्षता घेण्याचा आदेशाही देण्यात आला आहे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाने नियमांचे पालन न केल्यास याबाबत करावयाच्या उपायाबाबतचा सर्व खर्च वसूल करण्याचेही आदेशात म्हटले आहे.