निंबळक: - पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे,उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग कुशलतेने करणे गरजेचे आहे.त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे .गुणवत्तेबरोबरच सुसंस्कारीत,राष्ट्रभक्तीने प्रेरित होणारे विद्यार्थी शाळाशाळांमधून घडले पाहिजेत असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले .
महाराष्ट्र मराठी अध्यापक आंतरजाल उपक्रमांतर्गत आयोजित गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांच्या सत्कारसमारंभ कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सुनिल गाडे, सातारा यांनी केले. नेताजी डोंगळे, कोल्हापूर यांनी स्वागत गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले. आंतरजाल उपक्रम व सत्कार समारंभाची संकल्पना, माहिती भागवत घेवारे, उस्मानाबाद यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितली. प्रमुख पाहुण्यांची ओळख व गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन रंगनाथ सुंबे, अहमदनगर यांनी केले.आंतरजालच्या माध्यमातून प्रातिनिधिक स्वरूपात नंदिनी संतोष रोटे, आर्य चाणक्य विद्यालय, उस्मानाबाद या विद्यार्थीनीचा आई-वडिलांसह सत्कार पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत भागवत घेवारे सर यांनी केला. राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक के.डी.पवार व एन.एन.मुळे यांचा सन्मान रोप व पुस्तक देऊन घेवारे सर यांनी केला.
गुणवंत विद्यार्थी नंदीनी रोटे व नेहा महाजन, चोपडा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दीपक तोडकर, कोल्हापूर व के.डी.पवार सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या विविध नवोपक्रमांची माहिती दिली.
प्रमुख पाहुणे पद्मश्री पोपटराव पवार यांनी *पर्यावरण संरक्षण :काळाची गरज* या विषयावर शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पर्यावरण रक्षण व वृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे यासाठी हिवरे बाजारमधील पर्यावरण पूरक उपक्रमांची माहिती दिली.चराईबंदी,कुऱ्हाडबंदी, बालवृक्षमित्र पुरस्कार असे अनेक उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. समृद्धीबरोबरच गावाचं गावपण टिकविण्यासाठी, जपण्यासाठी विधायक कामांचा ध्यास विद्यार्थी व शिक्षकांनी घ्यावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.पाणी ही देशाची संपत्ती आहे. भविष्यात पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. हिवरे बाजारमधील पाणी व्यवस्थापनाची माहिती त्यांनी दिली. असंख्य अडचणींमधून सध्या आपला देश जात आहे. अशावेळी सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन त्यांनी केले.
उपस्थित मान्यवरांचे आभार सौ.सुमन गवळी ( पारनेर) यांनी मानले. सूत्रसंचालन सचिन यादव, कोल्हापूर यांनी केले. याप्रसंगी मराठी भाषा अभ्यासगट सदस्य मोहन शिरसाट, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ शिक्षक सतीश चिंदरकर, मुंबई यांच्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून मराठी विषय शिक्षक व गुणवंत विद्यार्थी सहभागी झाले होते.तांत्रिक बाजू विजय सरगर , जी.एल.शिंदे ,कल्याणकस्तुरे यांनी पार पाडली.