सुविधा नाहीत तर व्यवसायिकांना परवाना शुल्कही आकारू नका; काँग्रेसची मागणी

By अरुण वाघमोडे | Published: November 22, 2023 02:34 PM2023-11-22T14:34:55+5:302023-11-22T14:36:12+5:30

मनपाने मात्र, अशा पद्धतीने परवाना शुल्क आकारू नये, अशी मागणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.

if there are no facilities do not charge license fee to traders congress demand | सुविधा नाहीत तर व्यवसायिकांना परवाना शुल्कही आकारू नका; काँग्रेसची मागणी

सुविधा नाहीत तर व्यवसायिकांना परवाना शुल्कही आकारू नका; काँग्रेसची मागणी

अरुण वाघमोडे, अहमदनगर : शहर हद्दीतील बाजारपेठेसह शहराच्या कानाकोपऱ्यातील विविध प्रकारच्या ३५५ स्वरूपांच्या व्यवसायांना महापालिकेकडून वार्षिक परवाना शुल्क आकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत मार्केट विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला स्थायी समिती, महासभेसह आयुक्तांनीही मान्यता दिली आहे. येत्या काही दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. मनपाने मात्र, अशा पद्धतीने परवाना शुल्क आकारू नये, अशी मागणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.

याबाबत काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शिष्टमंडळासह बुधवारी मनपात आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी दशरथ शिंदे, संजय झिंजे, विलास उबाळे, अल्तमश जरीवाला, काँग्रेस उद्योग व व्यापार आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष मनसूख संचेती, उषा भगत, सुनीता भाकरे, शंकर आव्हाड, सोफियान रंगरेज, सुजित क्षेत्रे, हाफिज सय्यद, विकास भिंगारदिवे, आकाश अल्हाट, अजय गायकवाड, चंद्रकांत उजागरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी काळे म्हणाले नगर शहरात सुमारे ३५ ते ४० हजारांपेक्षा जास्त व्यावसायिक आस्थापना आहेत. यामध्ये व्यापारी, होलसेलर, रिटेलर, कापड विक्रेते, ज्वेलर्स, भांडी, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, बांबू विक्री, किराणा, रद्दी, फुले, रसवंतीगृह, गॅरेज, कोचिंग क्लासेस आदी सुमारे ३५५ सर्वच प्रकारच्या व्यवसायिकांचा समावेश आहे.

मनपा व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा देत नाही. बाजारपेठेसह शहराच्या सर्वच भागांमध्ये रस्त्यांची चाळण झालेली आहे. प्रचंड धूळ असते. याचा व्यवसायावर नकारात्मक परिणाम होत आहे. व्यापारी आणि त्या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना साधी लघुशंकेसाठी मुतारी देखील मनपा देऊ शकलेली नाही. अशा स्थितीत परवाना शुल्क आकारू नये, अशी मागणी काळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: if there are no facilities do not charge license fee to traders congress demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.