श्रीरामपूर : भंडारदरा, मुळा तसेच निळवंडे धरणांचेपाणी जायकवाडीत सोडल्यास त्याचा गंभीर परिणाम होऊन शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त होतील. त्यामुळे या प्रश्नावर शेतक-यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी दिला आहे. नेवासेचे आमदार शंकरराव गडाख यांनीही याप्रश्नी नगर औरंगाबाद महामार्गावर गुरुवारी रास्तारोको आंदोलन केले होते.समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार भंडारदरा व निळवंडे धरणांतून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुळा धरणातून मनमानी पद्धतीने निर्णय घेतल्याचे समजते. श्रीरामपूर-राहुरी मतदारसंघ तसेच संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, नेवासे, आदी उत्तर नगर जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पिकांमध्ये ६० ते ७० टक्के घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर व राहुरी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना आकडेवारीसह निवेदनही दिले असल्याचे आमदार कानडे यांनी सांगितले.केवळ रब्बीचा हंगाम पाटपाण्याच्या मदतीने घेणे एवढीच छोटीशी आशा आहे. त्यामुळे भंडारदरा, मुळा, निळवंडेच्या पाण्यावर शेतकऱ्यांना तग धरावा लागेल. शेतकऱ्यांना मान्य नसणाऱ्या अन्यायकारी समन्यायी पाणीवाटपाच्या कायद्याद्वारे भंडारदरा, मुळा तसेच निळवंडेतून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडल्यास शेतकऱ्यांवर त्याचे गंभीर परिणाम होतील. जायकवाडी धरणामध्ये पुरेसे पाणी असल्याने पाणी सोडण्याची गरज नाही. अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. जलसंपदा विभागाने असा निर्णय घेऊ नये, असे पत्र जलसंपदा विभागाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य अभियंता यांना दिल्याचे कानडे यांनी स्पष्ट केले.
जायकवाडीला पाणी सोडल्यास रस्त्यावर उतरू - आमदार लहू कानडे
By शिवाजी पवार | Published: November 03, 2023 3:46 PM