अहमदनगर : जायकवाडी धरणात नगर जिल्ह्यातील धरणांचे पाणी सोडल्यास जलसंपदामंत्र्यांसह पालकमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध करू, असा इशारा देत प्रहार जनशक्ती पक्षाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.नगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे, दारणा, गंगापूर, पानखेड या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. पाण्याचा विसर्ग किती प्रमाणात करण्यात येणार, याबाबतही सरकारने काहीही खुलासा केलेला नाही. याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाने यापूर्वी बाभळेश्वर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले होते. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयात लेखी निवेदनही दिले होते. मात्र, त्याला कोणतेच उत्तर मिळालेले नाही.आता जायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे तो रद्द करावा, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष तीव्र आंदोलन करेल, असे निवेदनात म्हटले आहे. कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करूननिवासी उपजिल्हाधिका-यांना निवेदन दिले.यावेळी प्रहारचे उत्तर जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, दक्षिण जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, राज्य उपाध्यक्ष संतोष पवार, जिल्हा कार्याध्यक्ष अजित धस, कृष्णा सातपुते, अभिजित दिघे, प्रदीप थोरात, अनिस तांबोळी, प्रकाश बेरड, गणेश कणसे, लक्ष्मण दिघे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
पाणी सोडले तर मंत्र्यांचे पुतळे जाळू : प्रहार जनशक्तीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 3:42 PM