लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : आमदारांच्या स्थानिक विकास निधीत सरकारने वाढ केली खरी, पण कोरोनामुळे सरकारचीच तिजोरी रिकामी झाली आहे़ पैसे नसल्याने सरकारने आमदारांच्या निधीला तुर्तास तरी कात्री लावली आहे़ त्यामुळे मतदारसंघातील ‘व्हिजन-२०२०’ पूर्ण करण्यासाठी सत्ताधारी विरोधी पक्षाच्या आमदारांचा चांगलाच कस लागणार आहे़ निधी मिळाला तरच आमदारांचे व्हीजन साकार होणार आहे. निधी मिळाला नाही तर सरकार दरबारी निधीसाठी आमदारांना ‘भजन’ आळवावे लागणार आहे. राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले़ अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांनी पहिल्याच अधिवेशानात आमदारांवर निधीची खैरात केली़ त्यांचा स्थानिक विकास निधी २ वरून ३ कोटी केला़ एकदम एक कोटींची बक्षिसी मिळाल्याने आमदारही खूश होते़ जिल्ह्यात विधानसभेचे १२, तर विधानपरिषदेचे २ असे, १४ सदस्य आहेत़ आमदारांच्या स्थानिक विकास निधीत १ कोटींची वाढ झाल्याने चालूवर्षी जिल्ह्यात ४२ कोटी रुपये विकास कामांसाठी मिळाले असते़ परंतु, कोरोनामुळे आता ७ कोटींवर समाधान मानावे लागेल़ यापैकी प्रत्येकी २० लाख, याप्रमाणे २ कोटी ८० लाख नियोजनकडे जमा झाले आहेत़ हा निधीही आरोग्यावर खर्च करावा, अशी अट आहे़ त्यामुळे पहिले वर्षे ‘कोरोना जा’, असे म्हणण्याची वेळ आमदारांवर आली आहे़जिल्ह्यातील कोपरगाव, नेवासा, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत- जामखेड मतदारसंघात सत्तांतर झाले़ अकोल्यात राष्ट्रवादीने, तर श्रीरामपुरात काँग्रेसने उमेदवार बदलले़ हे दोन्ही नवखे उमेदवार विधानसभेवर निवडून गेले आहेत़ अशा आठ मतदारसंघातील मतदारांनी बदल घडविला़ मतदारांची अपेक्षा पूर्तीचे हे पहिलेच वर्षे होते़ आजी-माजी आमदारांच्या कामाची तुलना मतदारांना यावर्षात करता आली असती़ पण, सरकारने आमदारांचा निधी गोठविला़ त्यामुळे मतदारसंघातील जनतेला निवडणूक काळात दिलेली अश्वासने पूर्ण करताना सर्वच आमदारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे़ मंत्र्यांकडे जे पाठपुरवा करतील, त्यांना वेगवेगळया योजनांतून निधी मिळेल़ पण, त्यासाठी आमदारांना आपले वजन वापरावे लागेल़ त्यात सहा आमदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत़ त्यामुळे त्यांना मतदारसंघात कामे करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे़ पहिल्यांदा निवडून आलेल्यांमध्ये सर्वाधिक पाच आमदार राष्ट्रवादीचे आहेत़--मंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्षनगर जिल्ह्याला बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख आणि प्राजक्त तनपुरे यांच्या रुपाने तीन मंत्री लाभले आहेत़ पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आहे़ हे मंत्री निधीसाठी सरकारकडे किती पाठपुरावा करतात, यावरच जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचे भवितव्य अवलंबून आहे़
विरोधकांना आयते कोलीतविकास कामांना निधी मिळणार नाही़ आडातच नाही, तर पोहºयात येणार कुठून? अशी अवस्था आहे़ विकास कामे तर नाहीच, पण आरोग्याचे प्रश्नही निर्माण झाले आहेत़ त्यामुळे मतदारसंघातील विरोधकांना हे आयते कोलीत मिळाले असून त्यांच्याकडून आमदारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होईल़ त्यामुळे आमदारांची दुहेरी कोंडी कोरोनामुळे होणार आहे़