संगमनेर : आपण बाहेरील देशातून, बाहेरील राज्यातून आलेला असाल तर आरोग्य तपासणीसाठी स्वयंस्फूतीर्ने पुढे या. निजामुद्दीनहून आलेल्या नागरिकांच्या संपर्कात कोणी आलेले असेल तर त्यांनी स्वत:हून प्रशासनाला कळवावे. आपल्यासाठी व आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी हे महत्वाचे आहे. अन्यथा प्रशासन सक्तीने कारवाई करेल. तसे अधिकार त्यांना दिलेले आहेत, असे आवाहन कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी एका पत्रकाव्दारे केले आहे.सामाजिक तेढ निर्माण होईल असे कृत्य कुणीही करू नये. समाज माध्यमांद्वारे बनावट व्हिडिओ, खोट्या बातम्या पाठवून वातावरण बिघडवू नये. प्रशासन कामाच्या तणावाखाली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने सण, उत्सव, जयंती पुण्यतिथीच्या सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. कॉँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. जयंतीच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे वाचन करून त्यांना अभिवादन आपण सर्व जण करणार आहोत, असेही थोरात यांनी म्हटले आहे.कोरोनाची लढाई निर्णायक वळणावरकोरोना विरोधातील लढाई निर्णायक वळणावर आली आहे. आतापर्यंत जी एकजूट आणि जिद्द दाखविली तिचे कौतुक आहे. आता कसोटीचा काळ सुरू झाला आहे. गुढी पाडवा, राम नवमी, पंढरपूरची वारी आपण सर्वांनी घरातच राहून साजरी केली. असेच सामाजिक भान यापुढेही ठेऊन कोणत्याही जातीचा, धर्माचा असा विचार करून सण उत्सव साजरे करण्यासाठी गर्दी करण्याची आवश्यकता नाही. येणारी महावीर जयंती, हनुमान जयंती, शब्ब-ए-बारात, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती हे उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करू नयेत, असेही थोरात यांनी पत्रकात म्हटले आहे.
बाहेर देशातून, राज्यातून आले असाल तर पुढे या..आरोग्य तपासणी करा; बाळासाहेब थोरात यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 3:19 PM