घारगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने जनसामान्यांवर कठोर निर्बंध लादले असताना संगमनेर तालुक्यातील पठारभागातून जाणाऱ्या मुळा नदीच्या पात्रातून दररोज खुलेआम हजारो ब्रास वाळूचा उपसा होत आहे. याबाबत जांबूत ग्रामस्थांनी विरोध केला असून, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडून खैरदरा परिसरातून होणाऱ्या बेकायदा वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
जांबूत बुद्रुक व जांबूत खुर्द येथील ग्रामस्थांनी जांबूत ग्रामपंचायत कार्यालयाकडे बेकायदा वाळू वाहतुकीची वेळोवेळी तक्रार केली आहे. जांबूत बुद्रूक व जांबूत खुर्द गावाशेजारी असलेल्या खैरदरा परिसरातील मुळा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू वाहतूक केली जाते.
नुकतेच गावातून जाणाऱ्या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काम पूर्ण झाले आहे. या रस्त्याने मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू वाहतूक झाल्यास रस्त्याची दुरवस्था होऊ शकते. याबाबत वारंवार तहसील कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु, अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. आजही राजरोस वाळू वाहतूक सुरू आहे. ग्रामस्थांची अडचण समजून घेत बेकायदा वाळू वाहतुकीवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच उत्तम पंढरीनाथ बुरके यांची सही आहे.
--
जांबूत बुद्रुक व जांबूत खुर्द येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे बेकायदा वाळू वाहतुकीची वेळोवेळी तक्रार केली आहे. आम्ही यापूर्वी तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. कारवाई न झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले असून कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. अन्यथा आम्ही लवकरच उपोषणास बसणार आहोत.
- उत्तम पंढरीनाथ बुरके,
सरपंच, जांबूत