तिसगाव : आगामी लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवार कोण हे आधी भाऊ, काकांना (घुले, ढाकणे) ठरवून घ्यावे लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप ढाकणे यांनी सूचित करुन चर्चेला जाहीर रुप दिले. मी कुठेही लढायला तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.पाथर्डी तालुकास्तरावर करण्यात येणा-या हल्लाबोल आंदोलनाच्या नियोजनार्थ साकेगाव येथे मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मेळावा घेण्यात आला. जनसुविधा अंतर्गत बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ढाकणे अध्यक्षपदावरुन बोलत होते. व्यासपीठावर पाथर्डी बाजार समितीचे सभापती बन्सी आठरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे, युवकचे अध्यक्ष महेश बोरुडे, बाजार समिती संचालक विष्णू सातपुते, बाळासाहेब घुले, बाबासाहेब चितळे, नगरसेवक बंडोपंत बोरुडे, सीताराम बोरुडे, ज्येष्ठ नेते गोरक्षनाथ सातपुते होते.चंद्रशेखर घुले म्हणाले, पाथर्डी तालुक्यातील अनेक संस्था ताब्यात असुनही भाजपाकडे विकासाचा निश्चित अजेंडा नाही. कर्जमाफीचा भुलभुलैया सुरूच आहे. वीज नाही तर आॅनलाईन फॉर्म भरायचे कसे? विविध योजना, लाभासाठींचे पती, पत्नी सोबत करावे लागत असलेले फोटोसेशन म्हणजे शेतकरीच खरे की खोटे? असा संशय उभे करणारे आहे. पुनर्गठन कर्जाचा समावेश कर्जमाफीत नसणे दुदैवी बाब आहे. हल्लाबोल आंदोलनातून सरकारचा नाकर्तेपणा पुढे आणू.मेळाव्यास सरपंच छाया सातपुते, युवा नेते काकासाहेब सातपुते, मुरलीधर वाघ, अनिल देवढे, बबनराव दुधाळ, बाजार समिती संचालक बाबासाहेब चितळे, फारूक शेख, योगेश वाळके, बंडोपंत अकोलकर, रामदास सातपुते, सुभाष मरकड, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक ज्येष्ठ नेते गोरक्षनाथ सातपुते यांनी केले. उपसरपंच आप्पासाहेब सातपुते यांनी आभार मानले.
मी कुठेही लढायला तयार आहे; लोकसभा, विधानसभेस कोण हे ठरवून घ्या - प्रताप ढाकणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 7:13 PM