प्रिय,दुचाकीस्वार,सप्रेम नमस्कार.आता कसं वाटतंय, माझ्या मागे मागे पळायला़़ माझा शोध घेत घेत दुकानात यायला, रोडच्या कडेला मला घेऊन बसलेल्या माणसांच्या मागे पिंगा घालायला?मी आधीपासूनच सज्ज होतो तुमच्या सेवेसाठी. पण तुम्हाला माझे ओझं वाटायचे़ कुठे घेऊन फिरायचं लोढणं, अशा शब्दातही हेटाळणीही माझ्या वाट्याला आली़ कदाचित आता असे वाटत असेल. पण आता पर्याय नाही़ मी नसेल तुमच्यासोबत तर तुम्हाला आर्थिक दंड ठरलेला आहेच़ दंड भरण्यापेक्षा घेताय मला. पैसे जाणार दंड भरताना, खिसा मोकळा होण्याची काळजी तुम्हाला़ पण जो मेंदू तुम्हाला पैसे कमवायला कामी येत आहे, त्याची काळजी कोण घेणार? तुम्ही वाट पाहत राहिलात नियम लागू होण्याची, सक्ती करून पावत्या फाडण्याची़ हेल्मेटसक्ती करण्यासाठी वापरण्यात आलेली यंत्रणा, त्यावर होणारा खर्च अमाप होत असेल. प्रशासनाला हे अतिरिक्त काम वाढले आहे. त्यात अजून तुमची काहींची अरेरावी ठरलेलीच. मी अमका, मी अजून कोणाचा तरी कोण.... कारणे तयार असतातच़ स्वत:ची काळजी स्वत: घ्यायला हवी. शासनाने कोणती आणि किती काळजी घ्यायची. आपले अस्तित्व आहे, आपण ते टिकवायला हवं.कर्ज काढून घर, गाड्या घेता. त्या गाडीला खूप जपता. घर पण खूप छान सजवता. खूप पैसे खर्च करत असता त्यासाठी़ पण तुमचा देह सुरक्षित असेल तर त्या सुंदर घरात शांती, समाधान लाभेल. तुम्ही स्वत:ला सुरक्षित ठेवले तर रस्त्यावर सुरक्षित वाटेल तुम्हाला.आजकाल खूप वेगाने गाड्या चालवल्या जातात़ लोकसंख्या वाढली आणि त्यात गरजा, हौस वाढली़ त्यामुळे रस्त्यावर माणसे तितक्या गाड्या असे चित्र दिसायला लागले़ मोबाईलमुळे तर ड्रायव्हिंगवर लक्ष नसतेच़ कारण आजकालची मुले आणि काही वयाने मोठी माणसेही एका हाताने मोबाईल कानाला लावायचा आणि दुसऱ्या हाताने गाडी चालवायची, यात रंगून गेली आहेत़ कधी कधी बोलताना भांडण चालू असते, डोक्यात अनेक विचार येतात. अशावेळी इतरांची चूक नसताना अपघात होतात़ अपघातांचे प्रमाण वाढते़ वेळेचा, पैशाचा अपव्यय होऊन न भरुन येणारी शरीरिक हानी होते़तुमच्याच सुरक्षेसाठी मी आलोय. आता माझ्यामुळे मोटारसायकल चालवताना फोनवर बोलण्याचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा आहे मला. काही कलाकार असतीलही ते हेल्मेटमध्येही मोबाईल अडकून बोलतीलच़ पण माझ्यामुळे तुमचे दोन्ही हात हँडल पकडून असतील, त्यातही मला समाधान आहे.नवीन नवीन असेही वाटेल बाजूचे काही दिसत नाही़ वेग कळत नाही़ मागचे, बाजूचे काही ऐकायला येत नाही. पण हळूहळू सवय होईल़ मग माझे महत्व तुम्हाला कळेल.मुली, महिला यांच्या समस्या तर खूप वेगवेगळ््या असतील़ त्यांना मी खूप जड वाटेल़ माझ्यामुळे त्यांचे कानातले त्यांना टोचतील़ त्यांचा हेअर कट बिघडून जाईल़ केस वाकडे तिकडे होतील. गाडीवर जर दोघे असतील तर गप्पा मारता येणार नाही. खूप अडचणींना सामोरे जातोय, असे वाटेल तुम्हा सर्वांनाच. पण माझ्यामुळे तुमच्या मेंदूच संरक्षण होणार आहे़ माझ्यामुळे डोळ््यात धूळ जाणार नाही़ डोळ््याला जोराचे वारे लागणार नाही़ कान हवा-गारव्यापासून सुरक्षित राहतील आणि सर्वात महत्वाचं अपघात झाला तर तुमच्या डोक्याला मार लागण्यापासून मी तुम्हाला मदत करेल़ तुमचा मार मी माझ्यावर झेलेल़ तुमचा मेंदू सुरक्षित ठेवेल, अशी ग्वाही देतो. आता तुम्ही मला ओझं म्हणून नाही तर सुरक्षा म्हणून स्वीकाराल, अशी अपेक्षा करतो.-तुमचाच सुरक्षारक्षक- हेल्मेट
स्वाती ठुबे - खोडदे, (लेखिका जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात औषध निर्माण अधिकारी आहेत.)