शेवगाव : तालुक्याच्या पूर्व भागातील कांबी येथे शनिवारी (दि.४) रात्री मुसळधार पाऊस झाला. गावालगत असणाऱ्या नदीला महापूर आला. पुराचे पाणी बाजारपेठेतील दुकानात शिरल्याने काही दुकाने वाहून गेली. यामध्ये छोट्यामोठ्या व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले. नदीकाठच्या बऱ्याच घरांमध्ये पुराचे पाणी शिरून घरांची पडझड झाली. भविष्यात ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी कांबी गावालगत मालेगाव (ता. गेवराई) रस्त्यावरील नदीवर ६ फूट उंचीचा पूल तातडीने उभारण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे व जनशक्ती मंचचे ॲड. शिवाजीराव काकडे यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन अधीक्षक अभियंता जे. डी. कुलकर्णी यांना देण्यात आले आहे. यावेळी जनशक्तीचे उपाध्यक्ष संजय आंधळे, भागवत रासनकर, नारायण सूर्यभान क्षीरसागर, राजू म्हस्के, अशोक तापकीर, गणेश होळकर, सौरभ राजपूत, भाऊसाहेब नामदेव माने, पांडुरंग झिरपे, संजय मस्के, सोमनाथ मतकर, सचिन मगर, परमेश्वर माने, नानासाहेब बोरुडे, बाबासाहेब काळकुंडे, चंद्रकांत मस्के, संभाजी टाकळकर उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे काही नागरिकांचा प्रपंच पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला आहे. कांबी गावच्या उत्तर बाजूला नदी आहे. त्या नदीवरील पूल कमी उंचीचा आहे. अतिवृष्टीत नदीला पूर आल्याने पूल पूर्णपणे खचला असून, काही भाग वाहून गेला आहे. पुलाच्या नळ्या कमी उंचीच्या असल्याने पाण्याची कोंडी होते. गावालगतच वाहणाऱ्या पाटाचे अतिरिक्त पाणीदेखील याच नदीच्या पात्रात सोडले जात असल्याने पाण्यामध्ये अजून भर पडते. त्यामुळे नदी दुथडी वाहते. परिणामी नदीपात्रातील पाणी काठच्या शेतात शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी, व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले. भविष्यात हा प्रकार पूर्णपणे थांबविण्यासाठी नदीवर ६ फूट उंचीचा पूल उभारावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
150921\2716179-img-20210915-wa0019.jpg
अधिक्षक अभियंता जे डी कुलकर्णी यांना कांबी नदीवरिल पुलाबाबतचे निवेदन देतांना जिल्हा परिषद सदस्यता हर्षदा काकडे, जनशक्ती आघाडीचे कार्यकर्ते.