संगमनेर : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणत असतील तर सरकारने अद्याप गुन्हाच दाखल केलेला नाही. मग सत्य बाहेर कसे येणार? असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. या प्रकरणात गुंतलेल्या डागी मंत्र्यांना तातडीने बडतर्फ करा, अशी मागणीही त्यांनी केली.
आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरला सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. पूजा चव्हाण आत्महत्येवर परखड भाष्य करून, महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. या घटनेचे गांभीर्य सरकारने अद्यापही दाखविलेले नाही. घटनेत गुंतलेले मंत्री अजूनही गायब असल्याकडे लक्ष वेधून, या घटनेतील सत्यता समोर यावी असे मुख्यमंत्र्यांसहित महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना वाटत असेल तर, अद्याप गुन्हा दाखल का झाला नाही, मग कशी सत्यता बाहेर येणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मागील वेळीसुद्दाधा मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीचे मंत्री अशाच घटनेमध्ये अडकल्यानंतर काय झाले, हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पाठीशी घालणारे हे सरकार आहे हाच संदेश राज्यात जातोय याचे भान महाविकास आघाडी सरकारने ठेवले, असे विखे यांनी स्पष्ट केली.
...
जिल्हा विभाजनासाठी महसूलमंत्र्यांनी तत्परता दाखवावी
अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनासाठी जिल्हा मागणी कृती समितीने पुन्हा सुरू केलेल्या पाठपुराव्याच्या संदर्भात भाष्य करताना आ. विखे पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीचे शिलेदारच राज्याचे महसूलमंत्री आहेत. आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने हा दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. ज्या पद्धदतीने ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यासाठी महसूलमंत्र्यांनी दाखविलेली तत्परता नगर जिल्ह्याच्या विभाजनासाठी दाखविली तर बरे होईल, असा खोचक सल्ला त्यांनी दिला.