अहमदनगर : शासनाच्या अमृत भुमिगत गटारीसाठी खोदलेले रस्ते तात्काळ दूरुस्त करण्याचा आदेश खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला. तसेच दहा कोटींच्या विशेष निधीतील कामांचे नव्याने अंदाजपत्रक तयार करण्याचे यावेळी ठरले.
खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत शनिवारी सायंकाळी बैठक झाली. बैठकीस महापौर बाबासाहेब वाकळे, स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, माजी नगरसेवक धनंजय जाधव, अजय चितळे, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे आदी उपस्थित होते. नगर शहरातील रस्ते भुयारी गटारीचे पाईप टाकण्यासाठी खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी मातीचे ढिग, दगड, पडल्यामुळे रस्ते खडबडीत झाल्याची तक्रार करत नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ठेकेदारांच्या प्रतिनिधींकडून माहिती घेऊन विखे यांनी गटारीच्या कामासाठी खोदलेले रस्ते तातडीने दुरुस्त करा, असा आदेश दिला.
शहरातील फेज- २ योजना रखडल्याचा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला होता. पाणी योजनेची माहिती घेत याबाबत स्वतंत्र बैठक घेण्याच्या सूचना यावेळी विखे यांनी केल्या आहेत. राज्य शासनाच्या विशेष निधीतून शहरात १० कोटींच्या कामांसाठी ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. मात्र यापैकी एकमेव निलक्रांती चौकातील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे अपूर्ण असल्याने संबंधित ठेकेदाराला नोटिस बजवण्याचाही आदेश विखे यांनी दिला आहे. तसेच या कामांसाठी नव्याने अंदाजपत्रक तयार करण्याचेही ठरले.
....
मुळा धरण येथील जलवाहिनी टाकण्याचे काम लांबणीवर
अमृत पाणी योजनेंतर्गत मुळा धरणातून नव्याने ११०० एमएम व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार होते. त्यामुळे येत्या १९ ते २९ जानेवारीपर्यंत शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र हे मुळा धरणात अकराशे ऐवजी ६०० एमएम व्यावसाची लाईन टाकण्यात येणार असून, ज्या लोखंडी पुलावर ही जलवाहिनी टाकण्यात येणार आहे, त्या पुलाचे स्टक्चरल ऑडीट करणे आवश्यक आहे. तसेच जलवाहिनी नव्याने मागविण्यात येणार असल्याने हे काम लांबणीवर पडल्याने शहराचा पाणीपुरवठा तुर्तास तरी विस्कळीत होणार नाही.
...
उड्डाणपुलाच्या कामाची विखे करणार पाहणी
शहरातील नगर- पुणे महामार्गावर उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचाी पाहणी खासदार विखे सोमवारी सकाळी सात वाजता करणार आहेत. यावेळी कामात येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.