अहमदनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेश मंडळांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मूर्तींची संख्याही वाढणार आहे. चार ते पाच फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती सार्वजनिक विहिरींमध्ये विसर्जन करण्यास महापालिकेने यंदा बंदी घातली आहे.यंदा दोनशेंपेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत. याशिवाय बालमंडळे, अपार्टमेंट, सोसायटी, घरगुती मंडळांमध्येही मोठ्या मूर्ती बसविल्या जातात. मोठ्या मूर्तींचे विसर्जन करणे विहिरींमध्ये अशक्य होते. शिवाय मोठ्या मूर्तींच्या विटंबनाची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर शहरातील बोल्हेगाव, नागापूर, केडगाव, यशोदानगर आणि बाळाजीबुवा विहिर येथे महापालिकेमार्फत वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. महापालिकेचे पथक मोठ्या मूर्ती स्वीकारणार आहे. या मूर्ती तलाव, जलाशयांमध्ये विसर्जित करण्यात येणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त राहुल द्विवेदी यांनीच अधिकाऱ्यांना नियोजन करण्याचा आदेश दिला आहे.
मोठ्या मूर्तींचे विहिरींमध्ये विसर्जन करण्यास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 3:15 PM