भिंगार : येथील मानाच्या देशमुख वाड्यातील गणपतीची उत्थापन पूजा जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते रविवारी झाली. यानंतर सनई चौघड्याच्या मंजुळ सुरात मंदिरातच फुलांनी सजवलेल्या कृत्रीम हौदात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. कोरोनामुळे भिंगारच्या इतिहासात प्रथमच अशा पध्दतीने विसर्जन करण्यात आले.
भिंगारमधील गणेश मंडळांचे नवव्या दिवशीच विसर्जन केले जाते. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे यावेळी पालन करण्यात आले. याप्रसंगी मोजकेच भाविक उपस्थित होते. ब्राह्मणगल्लीतील देशमुखवाडा गणपती मंदिरात स्वातंत्र्यसैनिकांनी पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. तेव्हापासून येथील मानाचा गणपती मानला जातो. येथील प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाला द्वादशीला मोठ्या भक्तीभावाने निरोप दिला जातो. याप्रथेस आज ९७ वर्ष पूर्ण झाली. मात्र यंदा मंदिरातच गणरायाची पूजा आरती व लगेचच प्रतिकात्मक विसर्जन झाल्याने इतिहासात याची नोंद झाली आहे.
विसर्जनप्रसंगी पोलीस निरीक्षक अविनाश मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अश्विन व कार्तिक देशमुख यांनी अखिलेशकुमार यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार केला.