अहमदनगर : कोरोनाच्या नियमांचे पालन करीत मुस्लीम बांधवांनी कोठला भागात मोहरमच्या सवा-यांचे रविवारी जागेवरच विसर्जन केले. जागेवरच विसर्जन करण्याची ही पहिलीच वेळ असण्याची शक्यता आहे.
नगरचा मोहरम देशात प्रसिद्ध आहे. कोरोनाच्या नियमांमुळे सवारी विसर्जन मिरवणुकीस पोलिसांनी बंदी घातली होती. या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांनीही सर्व नियमांचे पालन करीत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आणि प्रशासनाला सहकार्य केले.
कोठला येथील बारे इमाम (छोटे इमाम) आणि हवेली येथील बडे इमाम यांच्या सवा-यांची स्थापना झाली त्या जागेवरच मिरवणूक काढून जागेवरच विसर्जन करण्यात आले. दोन्ही ठिकाणी अतिशय शांतता आणि धार्मिक वातावरणात सवा-यांचे विसर्जन करण्यात आले.
पोलीस दलाने कोठला आणि हवेलीकडे येणारे सर्व रस्ते बंद केले होते. पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांच्या नेतृत्त्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सवारी विसर्जनासाठी मोजक्याच भाविकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासनातर्फे त्यांना पास देण्यात आले होते. कोठला परिसरात कोणालाही प्रवेश देण्यात आला नव्हता. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत विसर्जन झाल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले.