सन्मतीवाणीजैन धर्मीयांमध्ये नवपद आराधनेला अतिशय महत्व दिले जाते. नवपद आराधना जीवनाला कलाटणी देणारी मानतात. नमो अरिहंताम.. याचा अर्थ अरिहंत भगवंतांना नमस्कार करणे. जीवनात नम्रता आली नाही तर जीवनाला अर्थ नाही. जोपर्यंत अहंकाराचे वारे शरीराबाहेर जात नाही, तोपर्यंत धर्म साधना यशस्वी होणार नाही. अरिहंत शत्रूंचा नाश करणारा आहे. हे शत्रू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, माया हे आहेत. नमो सिद्धायाम म्हणजे सर्वात मोठे सिद्ध भगवंतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. अरिहंतांचा पांढरा रंग म्हणजे वात्सल्य, प्रेम, ममता याचे प्रतीक होय. आरोग्य क्षेत्रात जे लोक उदाहरणार्थ डॉक्टर, नर्सेस काम करतात त्यांच्या कपड्यांचा रंग पांढरा असतो. पांढरा रंग हा आरोग्याशी संबंधित आहे. दुर्बलांना सबल करण्यात अरिहंत मदत करतात. त्यांच्या कृपेमुळे कोणतीही ग्रहपीडा होत नाही. अरिहंत शक्तिशाली आहेत. त्यांच्यापुढे देवताही नतमस्तक होतात. परमात्म्याची सेवा केल्याने आपणास सुख समाधान प्राप्त होते. त्याचे सदैव गुणगाण केल्यास कर्म श्रृंखलेतून मुक्तता होते. एकवीस वेळा नमोकार मंत्र जपला तर चांगले फळ मिळते. नवपद साधना ही शरीरशुद्धीकरिता आहे. शरीर उत्तम स्थितीत कसे राहील याकरिता ही साधना केली पाहिजे. अन्नामुळे आजारपण येत नाहीत तर मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे शरीर प्रकृती बिघडते. त्यामुळे तिखट व मिठाशिवाय अन्न सेवन करावे.- पू. श्री. सन्मती महाराज
जैन धर्मीयांत नवपद आराधनेला महत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 11:30 AM