श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आमदार राहुल जगताप यांच्या निवासस्थानी श्रीगोंद्यातील राजकीय घडामोडी व रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा तालुक्यातील कारभारावर बंद खोलीत चर्चा झाली. श्रीगोंद्यात भाजपा नेते विश्वासात घेत नाहीत, अशा तक्रारींचा पाढा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वाचला. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेतील मानापानाचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व भाजपा नेत्यांची जुंपली आहे. संस्थेच्या जनरल बॉडीवर सुमारे २५० सदस्य आहेत. त्यापैकी श्रीगोंदा तालुक्यातील बबनराव पाचपुते, शिवराम पाचपुते, शिवाजीराव पाचपुते, बाबासाहेब भोस, अण्णासाहेब शेलार,प्रकाश पटवा व कुंडलिक दरेकर यांचा समावेश आहे. यातील तीन ते चार जण जनरल बॉडीचे सदस्य आहेत. संस्थेच्या घटनेप्रमाणे दरवर्षी ९ मे रोजी संस्थेच्या जनरल बॉडीची सभा होते. व या सभेत विषयपत्रिकेवरील विषयांवर धोरणात्मक चर्चा करण्याचा अधिकार जनरल बॉडी सदस्याला असतो. शाखांचे दैनंदिन कामकाज पाहण्याचे अधिकार विभागीय निरीक्षक, सहसचिव, आॅडीटर व सचिव यांना आहेत. दरम्यान, काही जनरल बॉडी सदस्य संस्थेच्या शाळांमध्ये हस्तक्षेप करतात, पदाधिकाऱ्यांचे अधिकार वापरतात, शिक्षकांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप आदी गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवार यांच्याकडे केले. आमदार दिलीप वळसे म्हणाले, पक्षीय राजकारण महाविद्यालयात आणू नये, अशा सूचना महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिलेल्या आहेत. त्यावर शरद पवार यांनी मे महिन्यात कठोर निर्णय घेऊ, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.माजी मंत्री बबनराव पाचपुते, बाबासाहेब भोस, प्रकाश पटवा, कुंडलिक दरेकर यांनी सुरुवातीपासून रयत शिक्षण संस्थेचा श्रीगोंद्यात शाखा विस्तार करण्यासाठी चांगले योगदान दिलेले आहे. आता हे नेते भाजपमध्ये आहेत. ‘रयत’च्या वर्तुळात हा चर्चेचा विषय आहे.(तालुका प्रतिनिधी)
‘रयत’मधील मानापमानाचा मुद्दा ऐरणीवर
By admin | Published: August 02, 2016 11:53 PM