अनिल साठे, शेवगाव : शेवगाव पोलिसांनी तत्परता दाखवत, बहुचर्चित शेअर मार्केट फसवणूक प्रकरणात तालुक्यातील गदेवाडी येथील इन्व्हेस्टींग डॉट कॉम या नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग करणाऱ्या दोन सख्या भावांच्या विरोधात, गुरुवारी (दि.१३) गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच, इतर एजंट नॉट रिचेबल झाले असून काहींनी धूम ठोकल्याची माहिती समोर येत आहे.
तालुक्यातील विविध गावात शेअर मार्केट ट्रेडिंग करणारे अनेक एजंट, नागरिकांची फसवणूक करुन फरार झाले आहेत. परिणामी फसवणूक झालेले नागरिक हवालदिल झाल्याचे पाहिला मिळत आहे. गुन्हा दाखल झाल्याने, फसवणूक झालेल्या नागरिकांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. फसवणुकीचे आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील हजारो लोकांची, हजारो कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेवगाव पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर उर्फ माऊली अशोक धनवडे ( रा. गदेवाडी ता. शेवगाव ) या शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरुन, तालुक्यातील गदेवाडी येथील इन्व्हेस्टींग डॉट कॉम नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग करणाऱ्या अक्षय मेशोक इंगळे, अविनाश मेशोक इंगळे या दोन बंधूंच्या विरोधात, गावासह आसपासच्या गावातील २६ लोकांची, ८३ लाख १० हजार रुपयांची फसवणुक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.